आस्थापना,व्यावसायिकांनी सवलतींद्वारे करावे मतदानास प्रोत्साहीत

आस्थापना,व्यावसायिकांनी सवलतींद्वारे करावे मतदानास प्रोत्साहीत
मतदानाचा टक्का वाढविण्यास मनपाचे आवाहन  

चंद्रपूर १२ एप्रिल – मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि लोकांना त्यांचे मताधिकार वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शहरातील आस्थापनांनी पुढे येत प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.या संदर्भात शहरातील विविध आस्थापनांची बैठक १२ एप्रिल रोजी मनपा सभागृहात आयोजीत करण्यात आली होती.
मतदान हा आपला हक्क असला तरी अनेकदा त्याबाबत उदासीनता असते त्यामुळे मतदारांना त्याबाबत जागरूक करणे आवश्यक आहे . मतदान केंद्रावर जाण्यास कंटाळा, सुटीचा दिवस,अनास्था अश्या विविध कारणांनी मतदानाचा टक्का खालावतो. मतदान वाढावे यासाठी शासकीय यंत्रणा तर प्रयत्नरत आहेच,मात्र त्याला संस्था,आस्थापना,व्यावसायिक यांची साथ मिळाल्यास निश्चितच मतदान जनजागृती होणार आहे.
येत्या १९ एप्रिल २०२४ रोजी १३- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणुक असुन अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासन व मनपाद्वारे प्रयत्न केल्या जात असुन विविध उपक्रम राबविले जात आहे. शहरात विविध आस्थापना जसे उपहारगृहे,मॉल,चित्रपटगृहे,दुकाने इत्यादी असुन या आस्थापनांनी जर मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी त्यांच्या उत्पादनांवर सवलत,बक्षिसे,सोडत पद्धतीने भेटवस्तु अश्या काही योजना राबविल्या तर नागरिक मतदान करण्यास प्रोत्साहीत होऊन शहराची मतदान टक्केवारी वाढण्याची संभावना असल्याने या उपक्रमात शहरातील आस्थापनांनी सहयोग करण्याचे आवाहन आयुक्तांद्वारे बैठकीत करण्यात आले. यावेळी आयुक्त विपीन पालीवाल,उपायुक्त मंगेश खवले,५० विविध संस्था,व्यावसायिक,आस्थापनांचे प्रतिनिधींनी उपस्थीत राहुन आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.