मतदान केंद्रावर जावू न शकणाऱ्या मतदारांना टपाली मतदानाची सुविधा !

मतदान केंद्रावर जावू न शकणाऱ्या मतदारांना टपाली मतदानाची सुविधा !

     मतदान करून घेण्यासाठी विविध चमू करणार गृहभेटी

           निवडणूकीच्या कामावरील अधिकारी कर्मचारी हे टपाली मतदानाने आपला हक्क बजावतात,परंतु जे मतदार मतदान केंद्रावर जावून मतदान करू शकत नाहीत अशा मतदारांकरीता यावेळी प्रथमच घरपोच टपाली मतदानाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरीच आपला मतदानाचा हक्क बजावता येईल.

           दरवेळी निवडणुकांमध्ये सेवा मतदार (Service Voters) व निवडणूकीच्या विविध कामांसाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतपत्रिकांची सुविधा उपलब्ध असते. परंतु त्याच्या सोबतच यावेळी प्रथमच मा. भारत निवडणूक आयोगाने  जे मतदार मतदान केंद्रावर काही कारणास्तव प्रत्यक्षरीत्या जाऊन मतदान करु शकत नाही.

          त्यांच्यासाठी गृह भेटी व्दारे टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. गृहभेटी व्दारे 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेले मतदार व 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेले दिव्यांग मतदार जे मतदानासाठी मतदान केंद्रावर जाण्यास इच्छुक नाही. त्यांना घरीच टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करता येणार आहे.

           त्यांना  फार्म 12 D भरुन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करावा लागेल. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  अशा मतदारांच्या गृहभेटी करून मतदान करुन घेतील. याकरीता निवडणूक निर्णय अधिकारी, सुक्ष्म निरीक्षण अधिकारी, निवडणूक व पोलिस कर्मचाऱ्‍यांची चमू तयार करण्यात येणार आहे. ज्या मतदानांनी फार्म 12 D भरलेला आहे, त्यांच्या घरी चमू जावून त्यांच्या मतदानाची प्रक्रिया पार पाडतील. मतदानाच्या अगोदर पत्र, BLO किंवा SMS व्दारे पुर्वसुचना दिली जाईल. 11-भंडारा-गोंदिया मतदार संघात गृहभेटी व्दारे मतदान 7  ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत पार पडेल.

          ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत कार्यरत असताना मतदानास उपस्थित राहणे शक्य होणार नाही त्यांचेसाठी मा. भारत निवडणूक आयोगाने टपाल मतदान केंद्राची (Postal Voting Centre) ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या मतदारांसाठी देखील पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी, निवडणूकीच्या कामांसाठी असणारे व्हिडीओग्राफर,वाहनचालक, क्लोनर्स यांचे टपालो मतपत्रिकेव्दारे 15 एप्रिल 2024 रोजी संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे (Facilitation Centre) सुविधा केंद्रात मतदान करतील.

            तसेच 12 ए्प्रिल ते 13 एप्रिल 2024 रोजी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे प्रशिक्षण आयोजित करतील व सुविधा केंद्रात त्यांचे टपालो मतपत्रिकेव्दारे मतदान करुन घेतील.  11-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील 3211 सैन्य दलातील मतदार यांची नोंद झाली असुन त्यांना ETPBMS या प्रणालीव्दारे ऑनलाईन मतपत्रिका पाठविण्यात आली आहे. त्या मतदारांना त्यांची मतपत्रिका त्यांचे Unit Officer यांचे मार्फत पुरविण्यात येईल. त्यावर त्यांनी मतदान करुन पोष्टाव्दारे मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात पाठवायच्या आहेत. मतदान झालेल्या टपाली मतपत्रिका ठेवण्यासाठी पोस्टल बॅलेट सुरक्षा कक्ष तयार करण्यात आला आहे. तेथे दररोज (शासकीय सुटीचे दिवस वगळून) पोस्टाव्दारे प्राप्त सेवा मतदार यांच्या टपाली मतपत्रिका दुपारी तीन वाजेपर्यंत जमा करण्यात येतील.

          टपाली मतदानाच्या सर्व प्रक्रियांमध्ये उमेदवार वा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहु शकतात. प्रतिनिधींची नेमणूक करतांना नमुना 10 भरुन द्यावा. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व मतदारांना टपाली मतपत्रिकेचा पर्याय जिल्हा निवडणूक कार्यालयाने उपलब्ध करुन दिला आहे.