भंडारा वासियांनो, चला झाडी बोली महासंस्कृती महोत्सवामध्ये सहभागी होऊया…

भंडारा वासियांनो, चला झाडी बोली महासंस्कृती महोत्सवामध्ये सहभागी होऊया

भव्य आयोजनात नामवंत कलाकारांचे सादरीकरण

महा संस्कृती उत्सवा दरम्यान पाच दिवस नाट्य-कला व संस्कृतीचा जागर

 

       भंडारा, दि.25: सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन भंडारा यांच्या वतीने उद्यापासून जिल्ह्यात पाच दिवस साहित्य- संस्कृती- नाट्य- भक्ती- संगीत या सर्वांचा सुंदर समन्वय असलेल्या महासंस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

       रेल्वे मैदानात होत असलेल्या या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी आज  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्यासोबत  सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

      या महोत्सवासाठी विविध  उपसमित्यांचे गठन करण्यात आले असून, सर्वांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमातील हा भव्य महासंस्कृती महोत्सव असणार आहे. यामध्ये स्थानिक कलावंतांसह नामवंत गजलकार भीमराव पांचाळे व संगीतकार सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्याखेरीज इंडियन आयडल फेम गायकांचा समावेश  आहे.

        स्थानिक कलावंतांमध्ये असर फाउंडेशनचे वतीने रयतेचा राजा हे शिवछत्रपतींवरचे नाटक सादर करण्यात येणार आहे.

        झाडी बोलीतील संस्कृतीमध्ये स्थानिक कलावंतांमध्ये लाखांदूर तालुक्यातील सखुबाई गोंधळी आणि संच  ह्या स्त्री गीतांमध्ये लग्न गीते, महादेवाची गाणी, पोळ्याची झडती ,नाथा जोगरी किनारी, खंजीर वादन ,गोंडी- नृत्य,

तर पवनी तालुक्यातील रतिराम नानहे आणि संच हे गोंधळ कथासार सादर करणार आहेत.

        उद्यापासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी 11 ते रात्री 10 विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सोबत महिला बचत गटांचे स्टॉल व विविध खाद्य पदार्थांची रेलचेल असणारे एकूण 48 स्टॉल लावण्यात येणार आहेत.

मोहाडी तालुक्यातील स्थानिक कलावंत नौटंकी आणि डहाका वाद्याचे  सादरीकरण करतील.

तर भंडारा जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेले दंडार, खडी गंमत ,मंगळागौर नृत्य यांचे सादरीकरण देखील विविध तालुक्यातून करण्यात येणार आहे.

         स्थानिक कलावंतांना व्यासपीठ देण्याचे उद्देशाने महासंस्कृती या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सातही तालुक्यातील स्थानिक कलावंतांचा समावेश असणारे विविध कार्यक्रम अंतर्भूत करण्यात आले आहेत.

         झाडीबोली महासंस्कृती महोत्सवात 29 आणि 30 जानेवारी रोजी शिवचरित्र व्याख्यान तसेच वाचन संस्कृती आणि आव्हाने यावरील परिसंवाद आणि काव्यतरंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या महा संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन उद्या दि .26 ला पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार आहे. तर विशेष उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील मेंढे,आमदार सुधाकर अडबाले, अभिजीत वंजारी, नानाभाऊ पटोले, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे,विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.