जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पाऊनकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कार्याला मनोहर पाऊनकर यांचे समर्थन

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पाऊनकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

चंद्रपूर, ता. ०२ : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना, मित्र पक्ष्याचे अधिकृत उमेदवार ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कार्यावर विश्वास दाखवत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चंद्रपुरातील हॉटेल एनडी येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचा दुपट्टा टाकत पाऊणकर यांचे पक्षात स्वागत केले.

श्री. मनोहर पाऊनकर यांनी चंद्रपूरचे नगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्हा धनोजे कुणबी समाज सल्लागार अशा विविध जबाबदा-या सांभाळल्या आहेत. त्यांच्यासोबत माजी सभापती विजय बल्की, मारेगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमण डोहे, संतोष मत्ते, सविता माशीरकर  यांच्यासह शेंणगाव, पिपरी, येरुर, छोटा नागपूर, सोनेगाव या गावातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच तत्परता दाखवली आहे. ते विरोधी बाकावर किंवा सत्तेत असो त्यांनी चंद्रपूरच्या विकासात निधीची अडचण भासू दिली नाही. रस्त्यांच्या निर्मितीपासून ते सैनिकी शाळा, अत्याधुनिक ई-वाचनालय, प्रशासकीय इमारतींचे बांधकाम, महिलांच्या सक्षमीकरणासाठी बांबूपासून वस्तूंची निर्मिती केंद्र, एसएनडीटी विद्यापीठाची निर्मिती, वन अकादमी, बॉटनिकल गार्डन अशा अनेक विकासकामांमुळे चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट झाला आहे. चंद्रपुरातील चौफेर विकास कामे आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांचा ठसा देशभर उमटला आहे, त्यांच्या या विकासकार्यावर प्रेरित होऊन मनोहर पाऊनकर यांनी प्रवेश घेतला यावेळी त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे संचालन अॅड. सुरेश तालेवार यांनी केले.