मतदान अधिकाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण जिल्ह्यात ५००५ मतदान अधिकाऱ्यांची निवड तर २६८३ राखीव

मतदान अधिकाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण
जिल्ह्यात ५००५ मतदान अधिकाऱ्यांची निवड तर २६८३ राखीव

कोणत्या विधानसभा मतदार क्षेत्रात सेवा देणार ते ठरले

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली.
निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर, जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, नोडल अधिकारी प्रशांत शिर्के व विवेक साळुंखे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी एस.आर.टेंभूर्णे तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सुनिल चडगुलवार, भारत खटी आदी यावेळी उपस्थित होते.
मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक २ व मतदान अधिकारी क्रमांक ३ यांची सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यात जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण ५००५ मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली तर २६८३ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. यात आरमोरी क्षेत्राकरिता १५७१ पुरूष व १९ महिला, गडचिरोली क्षेत्राकरिता १८५२ पुरूष व २२ महिला तर अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता १५२१ पुरूष व २० महिला मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
संबंधीत विधानसभा मतदार क्षेत्रात मतदान केंद्रनिहाय अधिकारी नियुक्त करण्यासाठी त्या-त्या विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय पुन्हा सरमिसळीची अंतिम प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.