‘कोविड-19’ महामारीचे कशाला करता राजकारण? पराजयाच्या भीतीमुळे प्रतिभा धानोरकर यांचे निराधार आरोप – देवराव भोंगळे

‘कोविड-19’ महामारीचे कशाला करता राजकारण?
पराजयाच्या भीतीमुळे प्रतिभा धानोरकर यांचे निराधार आरोप – देवराव भोंगळे

चंद्रपूर, 28 मार्च- ‘कोविड-19’ महामारीचा काळ संपूर्ण मानवजातीसाठी अत्‍यंत कठीण आणि तितकाच दुर्देवी काळ होता. या काळात करोडो लोकांचे जीव गेले, लाखो कुटुंब उध्‍वस्‍त झाले. ‘कोविड-19’ च्‍या जखमा आजही ताज्‍या असताना लोकसभा निवडणुकीच्‍या तोंडावर त्‍या जखमांना उकरण्‍याचे राजकारण त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसकडून सुरू झाले आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी नामांकन अर्ज सादर केल्‍यानंतर कॉंग्रेसच्‍या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपा-शिवसेना-राष्‍ट्रवादी महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्‍यावर आरोपाच्‍या थेट फेरी झाडल्‍या आहेत. कोविड-19 विषाणुच्‍या महामारीच्‍या काळात त्‍यांनी केलेल्‍या कामाचा पाढा वाचतानाच, स्‍वत:ला विकासपुरूष, लोकप्रतिनिधी म्‍हणवणारे सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना काळात काम केले नाही असा आरोप केला आहे.

हे आरोप धादांत खोटे आणि निराधार असल्‍याचे चंद्रपूरचे माजी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी म्‍हटले आहे. ‘कोविड-19’ च्‍या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या कामाची यादीच त्‍यांनी जाहीर केली आहे. ते म्‍हणाले, कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रात महविकास आघाडीचे सरकार होते.शासन व प्रशासनाच्या आधी या जिल्ह्यातील जनतेला मदतीचा पहिला हात देणारे नेते सुधीर मुनगंटीवार होते. अशा कठीण काळात राज्यात शासनातले नेते ढिंम होते. सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षात असूनही आरोग्य यंत्रणेच्या झूम बैठका घेत,यंत्रणेला कामाला लावले.

सरकारमध्ये नसतांनाही स्वतः पुढाकार घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना माॅस्क, पी. पी. ई. कीट्स आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देऊन कामाला लावण्याचे काम सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्‍यांनी पुढाकार घेऊन तत्कालीन आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, आरोग्य सचिव, यांच्यासोबत झूम बैठका घेऊन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधांना सरकारच्‍या मदतीची वाट न पाहता आवश्‍यक ते सर्व साहित्य वितरीत करण्‍याचे काम केले, असे देवराव भोंगळे म्‍हणाले.

देवराव भोंगळे पुढे म्हणाले, सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी २०० ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर, ५० व्हेंटिलेटर बेड तसेच, अनेकांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे काम केले. आरोग्य सेविका, डॉक्टर व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना १००० हून अधिक पीपीई किट देण्याचे काम सुधीर मुनगंटीवार यांनी केले. १०,६०० सॅनीटायझर बॉटल व कॅन, २,५,०००० मास्क, गरजूंना ५०,५६५ फुड पॉकेट तर २६,३८९ गरजु व्यक्तींना धान्यकिटचे वाटप केले आहे. याशिवाय, बाहेरगावी अडकलेल्या लोकांना स्वगृही आणण्याकरीता ३० ट्रॅव्हल्स, ४० ट्रक, ४० छोटी वाहनांची व्यवस्था, मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरांचे आयोजन, होमिओपॅथी गोळ्यांचे वितरण, रूग्णवाहिकांची व्यवस्थादेखील ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

‘झूठ बोले कौवा काटे’ ही हिंदीतील म्‍हण लोकांना चांगलीच माहिती आहे, त्‍यामुळे मतदारांनी अशा खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही देवराव भोंगळे यांनी यावेळी केले आहे