आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा Ø जिल्हाधिका-यांचे विभाग प्रमुखांना निर्देश

आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा Ø जिल्हाधिका-यांचे विभाग प्रमुखांना निर्देश

चंद्रपूर दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक हा कालबध्द कार्यक्रम असून चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभिर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

नियेाजन भवन येथे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, सहाय्यक जिल्हाधिकारी रंजित यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार आदी उपस्थित होते.

निवडणुकीच्या वेळी कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, प्रत्येकाने निवडणुकीचे गांभिर्य जाणावे व आपापली जबाबदारी काटेकारपणे पार पाडावी. निवडणूक हा कालबध्द कार्यक्रम असतो. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी पार पडणार आहे. त्यामुळे आपल्याकडे फक्त 1 महिना असून सर्व कामे अतिशय सुक्ष्म नियोजन करून पार पाडणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. तसेच निवडणुकीच्या कालावधीत परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे निर्देशही जिल्हाधिका-यांनी दिले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी आदर्श आचारसंहितेबाबत सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.