नर्सिग होम नूतनीकरणास मनपाची १० वर्षांची मुदतवाढ आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनंतर महापौर राखी संजय कंचर्लावार यांचा महत्वपूर्ण निर्णय

नर्सिग होम नूतनीकरणास मनपाची १० वर्षांची मुदतवाढ

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनंतर महापौर राखी संजय कंचर्लावार यांचा महत्वपूर्ण निर्णय

चंद्रपूर : महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनिमय, १९४९ अंतर्गत डॉक्टरांना नर्सिग होमचे दर तीन वर्षांनी नोंदणी व नूतनीकरण करावे लागते. नर्सिग होममध्ये इमारत तथा इतर सर्व सोयीसुविधा अनिवार्य असतात. त्यानंतरच नोंदणी व नूतनीकरण केले जाते. त्यानुसार शहरातील डॉक्टरांनी नर्सिग होम नूतनीकरण करावे, यासाठी नोटीस बजावली होती. दरम्यान, यासंदर्भात डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यानुसार झालेल्या बैठकीत कोरोना काळ असल्याने डॉक्टरांना दिलासा देण्याची सूचना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यानुसार महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी मनपाच्या आमसभेत हा विषय प्राधान्याने घेतला. चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रातील खासगी / नर्सिंग होम्सला नोंदणी / नुतनीकरण करण्यासाठी कोरोनाची स्थिती लक्षात घेता १० वर्षांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचा निर्णय मनपाच्या आमसभेत घेण्यात आला. त्यामुळे ३१ मार्च २०३१ पर्यंत दिलासा मिळणार आहे.

चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रातील बहुतांश खासगी नर्सिंग होम्सची नोंदणी व नुतनीकरण प्रलंबित असून, मागील सुमारे दोन वर्षांपासून कोविड -१९ महामारी दरम्यान संपुर्ण शासकीय प्रणाली महामारीचे प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता व्यस्त होती. या महामारी दरम्यान मनपा कार्यक्षेत्रातील रुग्णालयांनी जनहितार्थ भावनेने समोर जाऊन महामारीचे प्रादुर्भावास आळा घालण्या करीता शासकीय प्रणालीस मदतीचा हात दिलेला आहे. महामारीदरम्यान शासकीय प्रणाली तसेच या संस्थांचे प्रतिनिधी व्यस्त असल्याने खासगी / नर्सिंग होम्सला नोंदणी / नुतनीकरण करणे शक्य झालेले नाही. चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रातील खासगी/ नर्सिंग होम्सला नोंदणी / नुतनीकरण करण्याबाबत मनपाकडून कळविण्यात आले. तथापि, अशा नर्सिंग होम्सला नुतनीकरण करण्यास अडचण येत असल्यासंदर्भात डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे व्यथा मांडली. त्यावर चर्चा करण्यासाठी आयएमए सभागृहात झालेल्या बैठकीत महापौर राखी संजय कंचर्लावार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपाचे नगररचनाकार आशिष मोरे यांच्यासह डॉक्टर शिष्टमंडळ उपस्थित होते. सध्या कोरोना काळ असल्याने डॉक्टर रुग्णसेवेत आहेत. अशा धावपळीच्या आणि जनसेवेतील डॉक्टरांना दिलासा देण्यासाठी तोडगा काढण्याची सूचना विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनपाला केली. करीता ३१ ऑगस्ट रोजीच्या मनपाच्या आमसभेत सभागृह नेते संदीप आवारी यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित करीत चर्चा केली.
कोविड -१९ महामारीदरम्यान नर्सिंग होमचे नुतनीकरण बांधकाम परवानगी व जागा वापर परवानगीअभावी प्रलंबित आहे, त्यांना मनपाकडून पुढील दहा वर्षापर्यंत म्हणजेच दिनांक ३१/०३/२०३१ पावेतो संरक्षण देण्यात येत असल्याची महत्वपूर्ण घोषणा महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली. अशा प्रकारच्या मनपा कार्यक्षेत्रातील नर्सिंग होमधारकांना नियमित तीन वर्षानंतर नुतनीकरण करुन देण्यात यावे. नर्सिंग होम नोंदणी व नुतनीकरण बाबत मार्गदर्शन करण्याकरीता चंद्रपूर मनपाने शासनास पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने शासनाकडून घेण्यात येणारा धोरणात्मक निर्णय व शासनाच्या मार्गदर्शनाच्या अधीन राहून नुतनीकरण द्यावे, नर्सिंग होम्सच्या नविन नोंदणीकरीता प्रचलित यूडीसिपीआरनुसार हॉस्पिटल बिल्डिंग प्लॅन मंजुर असणे अनिवार्य करण्यात यावे. कायद्याची अंमलबजावणी मनपा चंद्रपूर सन २०१७ पासून करीत असून, यापूर्वी या कायद्याची अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर यांच्याकडून करण्यात येत होती. त्याअनुषंगाने मनपा कार्यक्षेत्रातील सन २०१७ पुर्वी त्यांच्याकडे प्रलंबित असलेले नुतनीकरण व नोंदणी प्रस्तावास मनपाकडून नोंदणी / नुतनीकरण करून द्यावे,असेही महापौरांनी सूचित केले आहे.