जागतिक श्रवण दिन संपन्न

जागतिक श्रवण दिन संपन्न

              भंडारा,दि.5: राष्ट्रीय कर्णबधिरता व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक श्रवन दिन व सप्ताह निमित्त जिल्हा रुग्णालय भंडारा येथे जागतिक श्रवण दिन व सप्ताहाचे उ‌द्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, भंडारा डॉ. दिपचंद सोयाम यांचे हस्ते करण्यात आले.

           या कार्यक्रमात एकुण २९ रुग्णांची तपासणी करण्यात आली व १० रुग्णांना श्रवणदोष यंत्र मोफत वाटप करण्यात आले. त्यापैकी ९ जेष्ठ नागरीक व १ वृध्द महिला यांना लाभ देण्यात आला.हा कार्यक्रम  २ मार्च, ते ९ मार्च, २०२४ पर्यंत सप्ताह म्हणून भंडारा जिल्हयात घेण्यात येत आहे.डॉ. दिपचंद सोयाम जिल्हा शल्य चिकित्सक, यांनी सर्व रुग्णाना सुचित केले की, या शासकीय योजनेचा लाभ सर्वांनी आवर्जुन घ्यावा व तसेच आपल्या गावातील वृध्द लाभार्थीना सुध्दा याची माहिती दयावी.

           कमी दिवसाचे व कमी वजनाचे बाळ असेल आणि त्याला श्रवण दोष होऊ नये याबाबत काळजी घेण्यात यावी. आणि श्रवणदोष झाल्यास वयाच्या दोन वर्षाच्या आत लाभार्थ्यांना मोफत Cochlear Implant बसविण्याची शस्त्रक्रिया सुध्दा करता येवू शकते. तसेच रुग्णालयातील विभागामध्ये श्रवणदोष असलेल्या लाभार्थ्यांसाठी कान-नाक, घसा तज्ञ, श्रवणतंत्रज्ञ, श्रवण सहाय्यक, भाषा निर्देशक असे तज्ञ व्यक्ती जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेसाठी  उपलब्ध आहेत.

      डॉ. बंडू नगराळे, कान- नाक घसा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, भंडारा यांनी रुग्णांना बहिरेपणा न येण्यासाठी गोंगाटापासून दूर राहावे, कानामध्ये कुठलेही तिक्ष्ण व इतर वस्तू टाकू नये, श्रवण क्षमतेची नेहमी तपासणी करत राहावी. संगीत समारोह आणि अन्य कार्यक्रमांमध्ये इयरपल्ग वापर करावा, लहान मुले व बयस्क यांच्या कानावर कधीही मारु नये, कानाची कुठलीही समस्या जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांकडे तपासून घ्यावे असे रुग्णांना मार्गदर्शन केले.

           जिल्हा रुग्णालय भंडारा येथे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित जागतिक कर्णबधिरता कार्यक्रम साजरा करण्यात आला.