राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 70 प्रलंबित आणि 367 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 70 प्रलंबित आणि
367 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली

गडचिरोली, दि.04: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांचे आदेशान्वये व मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात दिनांक ०३ मार्च, २०२३ रोजी या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयामध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेशाबाबतची कलम १३८ अन्वयेची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेची कर्ज वसुलीची प्रकरणे व दिवाणी प्रकरणे असे न्यायालयात प्रलंबीत दावे व दाखलपुर्व वाद प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत विजबील प्रकरणे, पतसंस्था व बँकाची थकीत कर्ज प्रकरणे, फायनान्स कंपनीची थकीत कर्ज प्रकरणे, ग्रामपंचायतींची थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे, घरकुल अनुदान वसुली प्रकरणे तसेच ग्राहक न्यायालयातील प्रकरणे, मोटार वाहन कायदा अंतर्गत चालान प्रकरणे ठेवण्यात आली होती. सर्व जिल्हयात मिळून एकूण १० पॅनल ठेवण्यात आले होते. या पॅनल समोर सर्व प्रकारची मिळून एकूण ७० प्रलंबित आणि ३६७ दाखलपुर्व खटले आपसात तडजोडीने निकाली निघाले. या लोकन्यायालयाच्या माध्यमातून एकूण रुपये २,३१,७३,८१०/- ची वसुली झाली. किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये एकुण ३१ प्रकरणे गुन्हा कबूली व्दारे निकाली निघाली.
वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात पती-पत्नी यांचा समझोता होवून पत्नी नांदायला गेल्याने यु. एम. मुधोळकर, जिल्हा न्यायाधिश १ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश, गडचिरोली यांनी समस्त न्यायाधीश वृंद यांचे उपस्थितीत उभयतांचा साडी-चोळी व शेला देवून सत्कार केला. ए. एम. करमरकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधिश, गडचिरोली व आर.आर.पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यु. एम. मुधोळकर, जिल्हा न्यायाधिश १ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश, गडचिरोली यांनी पॅनल क्र..०१ वर काम पाहीले, पॅनल क्र. ०२ वर एस. पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधिश (व.स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी, गडचिरोली, पॅनल क्र.०३ वर सी.पी.रघुवंशी, सहदिवाणी न्यायाधिश (क.स्तर)तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांनी काम पाहिले.
दिनांक ०३ मार्च २०२४ रोजी कार्यालयीन कामकाज दिवस घोषीत करून किरकोळ गुन्हयाचे खटले फौ.प्र.सं.कलम २५६, २५८ अन्वये तसेच गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता श्रीमती एन.सी.सोरते, तृतिय सह दिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांचे न्यायालय कार्यरत होते.
तसेच पॅनल क्रमांक ०१ मध्ये पॅनल सदस्य म्हणून नरेंद्र मोटघरे, विधी स्वयंसेवक, पॅनल क्रमांक ०२ मध्ये पॅनल सदस्य म्हणून प्रणय भैसारे, विधी स्वयंसेवक, पॅनल कमांक ०३ मध्ये पॅनल सदस्य म्हणून श्रीमती रिंकी भगत, विधी स्वयंसेविका यांनी काम केले.
सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघातील समस्त अधिवक्ता वृंद, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले. असे अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे