विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कारभाराची केली पोलखोल

मुंबई महापालिकेत चौकशी असलेले अधिकाऱ्यांची नियुक्ती का ?

मर्जीतील अधिकारी महत्वाच्या पदांवर बसले ठाण मांडून

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कारभाराची केली पोलखोल

मुंबई दि.1:-मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. सरकारच्या आशीर्वादामुळे महानगरपालिकेत अनेक वादग्रस्त अधिकारी ठाण मांडून आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीसाठी निवडणूक आयोगाने दोनदा पत्र दिले. तरी देखील सरकार बदली करत नाही. आयुक्त चहल यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. तरीही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल बदली का होत नाही? असा सवाल करत आज विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सरकारचे वाभाडे काढले.

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, आयआरएस केडरमधील अधिकारी सुधाकर शिंदे यांची का बदली होत नाही? त्यांच्या अँटीचेंबरमध्ये बसून असणारा जोशीबुवा कोण आहे? कोणाच्या मर्जीमुळे सुधाकर शिंदे वर्षानुवर्षे ठाण मांडून आहे? सरकारने अशा अपात्र अधिकाऱ्यांना महत्वाची पदे दिल्याने आयएएस अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. वेलारासू नावाचा अधिकारी पायाभूत सेवा समितीवर चौकशी सुरू कार्यरत असणे ही बाब गंभीर आहे.

सिडको येथे दिलीप ढोले यांची बदली केली. हे अधिकारी आयएएस नाहीत. त्यांची चौकशी सुरू असताना सिडकोत मोठ्या पदावर नेमले आहे. हे पद आयएएस दर्जाचे आहेत.परंतु आयएएस नसलेल्या अधिकाऱ्याला या पदावर बसवले आहे. हे हास्यास्पद आहे. हे अधिकारी अनेकांच्या तिजोऱ्या भरत आहेत. सुधाकर शिंदे महापालिकेत मालक झाले आहेत. सुधाकर शिंदे वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून पदावर बसून आहे. संजय जैस्वाल, अजय वैद्य, स्वाती पांडे, श्रद्धा जोशी अशी अनेक अधिकारी आहेत. सरकारने या अधिकाऱ्यांची मनमानी थांबवावी, असेही श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.