अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्याकरीता अनाथ पंधरवाडा Ø 23 फेब्रुवारी ते 5 मार्च कालावधीत आयोजन

अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्याकरीता अनाथ पंधरवाडा

Ø 23 फेब्रुवारी ते मार्च कालावधीत आयोजन

चंद्रपूर, दि. 26: जिल्ह्यातील अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्याकरीता दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीमध्ये अनाथ पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवाड्यामध्ये अनाथ बालकांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असून संपूर्ण राज्यात अनाथ पंधरवाडा राबविण्यात येत आहे.

जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत अनाथ प्रमाणपत्र देण्यात आलेल्या 158 बालकांना व जिल्ह्यातील इतर अनाथ मुलांना सदरील आवश्यक कागदपत्र मिळवून देण्याकरीता तालुकास्तरावर समर्पित कक्ष स्थापन करून 15 दिवस कार्यवाही करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 6 मार्च 2024 पर्यंत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सबंधितांना दिल्या.

विधानसभेमध्ये सन-2023 च्या हिवाळी अधिवेशनातील लक्षवेधी सूचना क्र. 1934 च्या चर्चेदरम्यान अनाथ बालकांचे विविध मागण्यासंदर्भात 5 फेब्रुवारी 2023 रोजी महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा सदस्य बच्चू कडू यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत अनाथ मुलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत अनाथ पंधरवाडा राबविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या.