अनाथ बालकांना विविध दाखले काढण्याकरिता शासन आपल्या दारी 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 पर्यत मोहिम राबविणार

अनाथ बालकांना विविध दाखले काढण्याकरिता शासन आपल्या दारी 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 पर्यत मोहिम राबविणार

गडचिरोली, दि.24: राज्यात अनाथ बालकांच्या विविध समस्या बघायला मिळतात. अनाथ बालकांना विविध दाखले काढण्याकरिता अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील लक्षवेधी सुचना चर्चेदरम्यान विधानसभेत अनाथ बालकांच्या विविध मागण्या संबधीत बैठक घेण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार मंत्री, महिला व बाल विकास यांचे अध्यक्षतेखाली मा. श्री. बच्चु कडु, विधानसभा सदस्य यांच्या समवेत दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये दिनांक २३ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२४ या कालावधीत अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान कार्ड इत्यादी कागदपत्रे त्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत संपूर्ण राज्यात पंधरवाडा राबविण्यासंबधीत सुचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर महिला व बाल विकास विभाग व महसुल विभाग यांच्या समन्वयाने अनाथ मुलांना शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातून जिल्हयातील सर्व तालुका स्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे १५ दिवसांकरिता समर्पित कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. याबाबत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना याबाबत सुचना दिलेल्या आहे. तरी जिल्हयातील सर्व अनाथ बालकांनी या पंधरवाडा मध्ये सहभागी होवून आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान कार्ड इत्यादी कागदपत्रे काढण्याकरिता संबधीत तहसिल कार्यालयाशी संपर्क साधुन त्याचा लाभ घ्यावे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.