‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे पुण्यात 24 फेब्रुवारीपासून आयोजन

‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे पुण्यात 24 फेब्रुवारीपासून आयोजन

            मुंबई  दि. 18 :  संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन कारणाऱ्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी 24 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान पुणे येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करणारा महाराष्ट्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच डिफेन्स एक्स्पो असून पुण्यातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.

            संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राविण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने जल, स्थल आणि वायू या तिन्ही सुरक्षा दलांचा यात महत्वाचा सहभाग असणार आहे. यात दोनशेहून अधिक सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि 20 हजारहून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन  ज्ञानाची देवाण-घेवाण करतील.

            भारताचे औद्योगिक बलस्थान म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र हे आत्मनिर्भर भारताचे संवर्धन करण्यात आघाडीवर असलेले राज्य आहे. राज्यात 39.88 लाख  एम.एस.एम.ई.चे मजबूत जाळे आहे. ज्यात उद्यम पोर्टलवर 108.67 लाख रोजगार आहेत. एम.एस.एम.ई. डिफेन्स एक्स्पो अशा उद्योगांना त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि संरक्षण उद्योगातील प्रमुख भागधारकांशी जोडण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ प्रदान करेल.

एम.एस.एम.ई. डिफेन्स एक्सपो 2024 ची ठळक वैशिष्ट्ये : या एक्स्पोमध्ये 200 हून अधिक एम.एस.एम.ई. प्रदर्शक त्यांची संरक्षण- संबंधित उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचे विविध क्षेत्र जसे की एरोस्पेस, शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण आणि लॉजिस्टिक्स याचे प्रदर्शन करतील. एम.एस.एम.ई. आणि प्रमुख संरक्षण खरेदी संस्था, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि संभाव्य गुंतवणूकदार यांच्यात संवाद सत्रे होतील.

नॉलेज सेमिनार :  प्रख्यात तज्‍ज्ञ आणि विचारवंत नेते, संरक्षण क्षेत्रातील नवीनतम ट्रेंड, संधी आणि आव्हाने यावर दृष्टीक्षेप टाकतील.

कौशल्य विकास कार्यशाळा : संरक्षण उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एम.एस.एम.ई.  कर्मचाऱ्यांची कौशल्ये आणि क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने परस्परसंवादी सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

सरकारी सहाय्य उपक्रम : संरक्षण उत्पादनात एम.एस.एम.ई. ना समर्थन देण्यासाठी विविध सरकारी योजना, धोरणे आणि आर्थिक सहाय्य पर्याय प्रदर्शित करण्यात येतील.

धोरणात्मक भागीदारी : संरक्षण क्षेत्रात एम.एस.एम.ई. ना  व्यवसाय वाढवण्यासाठी संभाव्य खरेदीदार, सहयोगी गुंतवणूकदारांशी संपर्क साधता येईल. तज्‍ज्ञांचे  सेमिनार आणि कार्यशाळांद्वारे संरक्षण उद्योगातील नवीनतम घडामोडी आणि ट्रेंड्सवर अपडेट मिळू शकतील.

आर्थिक सहाय्य : संरक्षण क्षेत्रातील एम.एस.एम.ई. च्या वाढीला चालना देण्यासाठी सरकारी योजना आणि निधीच्या संधी उपलब्ध होतील. या एक्स्पोद्वारे एम.एस.एम.ई. ना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. यामध्ये उद्योग जोडणी सुलभ करणे, तांत्रिक सहाय्य ऑफर करणे आणि नियामक प्रक्रिया सुव्यवस्थित करणे समाविष्ट आहे. यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये  त्यांना सक्रियपणे सहभागी होण्यास सक्षम करतील. एम.एस.एम.ई.  डिफेन्स एक्स्पो 2024 मध्ये एम.एस.एम.ई., संरक्षण अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील 2 हजारहून अधिक  संस्था सहभागी  होतील, असेही त्यांनी सांगितले.

            एल ॲण्ड टी. डिफेन्स, महिंद्रा, टाटा, डीआरडीओ, सोलार, भारत फोर्ज आणि  सार्वजनिक सरंक्षण क्षेत्रातील उपक्रम (PSU) सारख्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी केलेल्या नाविण्यपूर्ण संरक्षण उत्पादनामुळे  महाराष्ट्राची संरक्षण क्षेत्रात प्रमुख उत्पादक म्हणून ओळख निर्माण झाली आहे.  यात सहभागींना  फायदेशीर व्यावसायिक संधी, शेकडो कोटींचे संभाव्य करार आणि संरक्षण तंत्रज्ञान निर्यात क्षेत्रातील एमएसएमई आणि स्टार्ट-अप्ससाठी लाभदायक ठरेल.

            “हा एक्स्पो आपल्या राज्याच्या संरक्षण क्षमता बळकट करण्याची शासनाची बांधिलकी अधोरेखित करतो. नाविन्य आणि सहकार्यावर लक्ष केंद्रित करून, हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतो. आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत आत्मनिर्भरतेकडे, संरक्षण क्षेत्रातील वाढ आणि नवकल्पनांना चालना देणारा आहे ”, अशा भावना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.”

            “आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरंक्षण क्षेत्रात आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात संरक्षण एम.एस.एम.ई.  तयार झाल्या आहेत. तिनही सैन्य दलाचा सहभाग यात असणार आहे. आज देशात मोठया प्रमाणात संरक्षण साहित्य निर्माण होत असताना महाराष्ट्रात 10 ऑर्डंनंस फॅक्टरी आणि 5 डिफेन्स पी. एस. यू. आहेत. याची राज्यात इकोसिस्टिम तयार झाली आहे. टाटा, भारत फोर्ज, सोलार, एल ॲण्ड टी, अशा मोठ्या कंपन्या राज्यात संरक्षण क्षेत्रात उपादने तयार करतात.  यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योजक येतील, गुंतवणूक वाढेल. मुख्य म्हणजे उत्पादन करणारे आणि खरेदीदार आर्म्ड फोर्स असे दोन्ही एका ठिकाणी एकत्र असतील. उद्योग विभागाने पुढाकार घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. आजपर्यंत झालेल्या एक्स्पोमधील सर्वात मोठा एक्स्पो महाराष्ट्रात करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

            “महाराष्ट्रातील एमएसएमईच्या संरक्षण उत्पादनातील अफाट क्षमतेचा उपयोग करण्यासाठी हा एक्स्पो एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्थानिक नवकल्पना वाढवून आणि देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या प्रधानमंत्री यांच्या दृष्टीकोनाशी  सुसंगत असल्याच्या भावना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या.