आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत वार्षिक स्नेहसंम्मेलन व मार्गदर्शन शिबीर

आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत वार्षिक स्नेहसंम्मेलन व मार्गदर्शन शिबीर

              भंडारा दि.9 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा अंतर्गत आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक1 व 2 यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकतेच आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह भंडारा क्रमांक 1 येथे आयोजित करण्यात आले होते. अभ्यासासोबतच विदयार्थ्याचा सर्वागिण विकास व्हावा यासाठी वसतीगृहातील मुले /मुलींच्या बॅडमिंटन, बुध्दीबळ, गोळा फेक, कबडडी, व्हालीबॉल, चित्रकला, रस्सीखेच तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा, इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

             तसेच सांस्कृतीक कार्यक्रमाअंतर्गत  वेगवेगळे पारंपारीक आदिवासी नृत्य, नाटक, सामुहीक व एकल नृत्य तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. बिजू गवारे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांच्या हस्ते  साकारण्यात आले.बिजू गवारे यांनी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन केले. या कार्यक्रमाला निरज मोरे प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भंडारा , यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. वंदना लुटे, प्राचार्य एस. जी. बी. डिफेंस सर्विस ज्युनियर कॉलेज शहापूर यांनी विद्यार्थ्याना वसतीगृह गृहपाल व विद्यार्थ्यानी समन्वय साधुन शैक्षणिक विकास कसा साधावा याविषयी मार्गदर्शन केले,

           गणेश खडसे, प्राध्यापक, करिअर कॉन्सीलर एस. जी. बी. डिफेंस सर्विस ज्युनियर कॉलेज शहापूर यांनी भारतीय संरक्षण दल, अर्ध सैनिक बल ईत्यादी मधील विवीध पद भरती व त्या अनुषंगाने घेण्यात येणारी लेखी परिक्षा व शारिरीक क्षमता चाचणी याबाबत मार्गदर्शन केले.

           डॉ. प्राध्यापक वामन शेडमाके आदिवासी सेवक यांनी गुणवत्ता शिक्षण घेवून विवीध मार्गाने देश सेवेचा वसा घ्यावा असे मार्गदर्शन केले. जगदीश मडावी, मुख्य संघटक आफ्रोट भंडारा यांनी  संघर्षा सोबतच विद्यार्थ्यांनी कायदयाचा अभ्यास करून कायदेतज्ञ बनावे असे संबोधित केले.

          नरेश आचला, जिल्हा संयोजक रा.आ.ए. परिषद भंडारा, यांनी विद्यार्थ्यांना कायदयाचे शिक्षण घेवून त्याचा उपयोग समाजसेवेसाठी कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. मा. विनोद वटृी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद प्रतिनिधी, यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. मा. श्री निरज मोरे, प्रकल्प अधिकारी  यांनी सांगीतले की, ज्या ज्या व्यक्तींनी जिवनात विवीध क्षेत्रात आपली ध्येय पुर्ती केलेली आहे त्या सर्वांनी संघर्षातुन स्वत:ला सिध्द केलेले आहे.

            क्षेत्र कोणतेही असो मग ते प्रशासकीय अधिकारी असतील किंवा उद्योजक असतील, उत्पादक असतील संघर्ष करूनच ध्येय प्राप्त केले जावू शकते. विद्यार्थ्यांनी सध्या उपलब्ध असलेल्या स्पर्धा परिक्षा वर्ग, ईटरनेट यांचा उचित लाभ घेवून आपले भविष्य घडवावे. तसेच जीवनात काहीही कठीण नाही, याची जाणीव करून दिली. मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांकरीता सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी/विद्यार्थीनींनी आदिवासी पारंपारीक नृत्य, नाटक, सामुहीक व एकल नृत्य सादर केले.

            या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचारी , तथा प्रकल्प कार्यालयाचे कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन शिवकुमार अरकरा व सीमा पेंदाम हयांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. कविता घरत यांनी केले.