महिला व बालविकास विभागातर्फे “संवाद योजना”
चंद्रपूर,दि.01: काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालके बालगृहामध्ये राहत असतात. या बालकांना वन स्टॉप सेंटर आणि स्त्री आधार केंद्र येथील महिलांना आधार मिळावा आणि बालक व महिलांशी संवाद साधून प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी महिला व बालविकास आयुक्त यांच्या संकल्पनेतून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात संवाद योजना राबविण्यात येत आहे.
याअंतर्गत बालकांचा शारीरिक, मानसिक विकास व्हावा हा योजनेचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी महिन्यातून एक दिवस बालगृहात निवासी थांबणार आहे. महिला कर्मचारी मुलींचे बालगृह, स्त्री आधार केंद्र तर पुरुष कर्मचारी मुलांचे बालगृह येथे निवासी राहतील. येथील महिला व बालकांची हितगुज करत महिला व बालक राहत असलेल्या संस्थेतील राहण्याची व्यवस्था, जेवण, स्वच्छता, आरोग्य विषयक काळजी आणि सोयी सुविधा व त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून त्यावर उपाययोजना करणार आहेत.
बालगृहात राहणाऱ्या बालकांचे शारीरिक आणि मानसिक विकासाबाबत सर्व कर्मचाऱ्यांना जबाबदारी घ्यायची आहे. सदर उपक्रमामध्ये जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड लाईन, वनस्टॉप सेंटर आदी कर्मचारी सहभागी होणार आहेत. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.