2024 हे वर्ष नव मतदारांसाठी विशेष : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

2024 हे वर्ष नव मतदारांसाठी विशेष : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

पात्र नवमतदारांनी नावनोंदणी करून आपले अधिकार बजवावे असे आवाहन

            भंडारा, दि.25: तरुणांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 25 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ देशभरात साजरा केला जातो पण 2024 हे वर्ष आपणा सर्वांसाठी आणि नव मतदारांसाठी विशेष आहे कारण या वर्षी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका होणार आहेत. मतदानाचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे आणि जास्तीत जास्त पात्र नव मतदारांनी नावनोंदणी करून आपले अधिकार बजवावे, असे आवाहन भंडारा जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. स्थानिक नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयात 14व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणाप्रसंगी ते बोलत होते.

         या प्रसंगी मंचावर प्रमुख अतिथि बिजु गवारे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, योगेश घाटबांधे आंतरराष्ट्रीय अॅथ्लीट आणि निवडणूक दूत, प्रशांत पिसाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, गजेंद्र बालपांडे, उपविभागीय अधिकारी, रवींद्र सलामे, शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा स्वीप (SVEEP) नोडल अधिकारी, वनिता लांजेवार, तहसीलदार भंडारा, बाबासाहेब तेढे, तहसीलदार तुमसर, निलू तिडके, प्राचार्य नूतन कन्या कमवि तसेच शेखर बोरसे, सचिव, नवीन मुलींची शाळा संस्था उपस्थित होते.

याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनात प्रमुख अतिथि बिजु गवारे यांनी सांगितले की यापूर्वी मतदाराचे पात्रता वय 21 वर्षे होते, परंतु 1988 मध्ये ते 18 वर्षे करण्यात आले. 25 जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा (ECI) स्थापना दिवस आहे जो 1950 मध्ये अस्तित्वात आला आणि 2011 पासून हा दिवस देशभरात राष्ट्रीय मतदाता दिवस म्हणून साजरा केला जात आहे. 2024 वर्षीची थीम ‘मतदानासारखे दुसरे कार्य नाही, मी खात्रीने मतदान करेल’ ही आहे.

         यावेळी जिल्हा रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच स्वीप टीमचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व इलेक्टोरल लिटरसी क्लबचे (ELC) उद्घाटन जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. साहिली झंझाडे या नव मतदार विद्यार्थिनीने मतदानाच्या अधिकारावर स्वरचित कविता सादर केली. नूतन कन्या शाळेच्या चमूने ‘मतदार राजा जागा हो’ या विषयावर तर बेसिक उच्च प्राथमिक शाळेच्या चमूने ‘मतदानाला चला’ या विषयावर पथनाट्य सादर केले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवमतदारांचा गौरव करण्यात आला.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य निलू तिडके, संचालन लीना चीचमलकर तर आभार प्रदर्शन रोहिणी मोहरील यांनी केले.कार्यक्रमादरम्यान निवडणूक आयोगाद्वारे सुभाष घई फाऊंडेशनच्या सहकार्याने निर्मित “मैं भारत हूँ- हम भारत के मतदाता हैं” हे गाणे देखील दाखवले गेले तर कार्यक्रमाचा समारोप मिलिंद इंगळे यांच्या ‘ये पुढे, मतदान कर’ या मराठी गाण्याने झाला.