जिल्हा कृषि महोत्सव 26 जानेवारीपासुन

जिल्हा कृषि महोत्सव 26 जानेवारीपासुन

 भंडारा दि. 23 : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ ते ३० जानेवारी २०२४ दरम्यान “रेल्वे मैदान, नुतन महाराष्ट्र शाळेजवळ, खात रोड, भंडारा ” येथे जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कृषि महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी आदिवासी विकास मंत्री  तथा पालकमंत्री, भंडारा विजयकुमार गावित,  यांचे हस्ते होणार आहे. जिल्हा परीषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे हे अध्यक्षस्थानी असतील.

कृषी प्रदर्शन, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री, चर्चासत्र व परिसंवाद, शेतकरी सन्मान समारंभ, महिला बचतगट निर्मिती वस्तूंचे प्रदर्शन व विक्री ही महोत्सवाची वैशिष्ट्य आहेत. या महोत्सवात सेंद्रीय पध्दतीने उत्पादीत केलेले सुगंधित तांदुळ आदी अन्नधान्य विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्याचप्रमाणे कलात्मक वस्तु, खाद्य पदार्थ आणि बचत गटांनी तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तुंचे स्टॉल राहणार आहेत.

या महोत्सवात दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, भाजीपाला, धानावरील प्रक्रिया उद्योग, रेशीम उद्योग, पशुखाद्य, शेती अवजारे, ड्रोन प्रात्याक्षिके, नाबार्ड व बँकेचे स्टॉल प्रामुख्याने असणार आहेत. शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी विविध विषयावरील परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

शेतीमध्ये विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा या महोत्सवात सत्कार केला जाणार आहे. याशिवाय शासनाच्या विवि बभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात येतील. शेतकरी बंधुसाठी माहितीपूर्ण असणाऱ्या कृषी महोत्सवात जास्तीत जास्त शेतकरी, ग्राहकांनी तसेच नागरीकांनी भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, भंडारा यांनी केले आहे.