जिल्ह्यात 23 ते 31 जानेवारी या कालावधीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण  

जिल्ह्यात 23 ते 31 जानेवारी या कालावधीत

मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण  

Ø घरी येणा-या प्रगणकांना योग्य उत्तरे देऊन सहकार्य करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 22 : राज्य शासन व महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम 23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

सर्व्हेक्षणाच्या कामाकरीता चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, शिक्षक व इतर कर्मचारी असे एकूण 4008 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कृषी अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, मंडळ अधिकारी व इतर असे एकूण 270 अधिका-यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने आयोगाकडून नियुक्त पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट येथील प्रशिक्षकांकडून 20 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नोडल अधिकारी तसेच प्रत्येक तालुका प्रशिक्षकांना तसेच 21 व 22 जानेवारी रोजी तालुकास्तरावर सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले.

घरोघरी येऊन सर्व्हेक्षणाचे कामकाज करणा-या प्रगणकांना आयोगाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील सर्व कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाकरीता प्रश्नावली निश्चित करण्यात आली आहे. सदर सर्व्हेक्षण हे मोबाईल ॲपद्वारे होणार आहे. तरी प्रगणकाच्या घरभेटीवेळी कुटुंबातील सज्ञान सदस्याने घरी थांबून सर्व्हेक्षण करणा-यास सहकार्य करावे व विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.

नोडल अधिका-यांची नियुक्ती : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व नगर परिषद / नगर पंचायत क्षेत्राकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून तर निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार हे सहायक जिल्हा नोडल अधिकारी आहेत. चंद्रपूर शहर महानगर पालिका क्षेत्राकरीता आयुक्त विपीन पालीवाल यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच आयोगाकडून तालुका स्तरावर तालुका नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार आणि सहायक नोडल अधिकारी म्हणून नगर परिषद / पंचायतीचे मुख्याधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.