अपघातमुक्त चंद्रपूरचे स्वप्न साकार करूया : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार //रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

अपघातमुक्त चंद्रपूरचे स्वप्न साकार करूया : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

जनजागृती आणि शास्त्रशुध्द नियोजन करण्याच्या सूचना

रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 16 : जीवन अतिशय अमूल्य आहे. जीवापेक्षा कोणतीच संपत्ती मोठी नाही. सृष्टीच्या नियमानुसार नैसर्गिक मृत्यु सर्वांनाच आहे. मात्र अनमोल जीव निष्काळजीपणामुळे रस्ते अपघातात गमावू नका. प्रत्येक जण रस्ता सुरक्षा समितीचा सदस्य आहेत. त्यामुळे आपल्या हातून कोणतीही चूक किंवा अपघात होणार नाही, असा संकल्प करून चंद्रपूर जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सकारात्मक जनजागृती आणि शास्त्रशुद्ध नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलिस विभागामार्फत जिल्ह्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ करतांना श्री. मुनगंटीवार बोलत होते. मंचावर प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियान हा अतिशय महत्वाचा विषय आहे. अपघात घडणार नाही, असा संकल्प करणे गरजेचे आहे. यासाठी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करून सप्ताह, पंधरवडा किंवा महिनाभर हे अभियान न राबविता 365 दिवस रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबवावे. भविष्यात अपघात शून्यावर आणायचे असतील तर तरुणांना वाहन सुरक्षेच्या कायद्याचे ज्ञान देणे गरजेचे आहे.

एखाद्याचा जीव वाचविणे हे सर्वांत पुण्याचे काम आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघातप्रवण स्थळांची (ब्लॅक स्पॉट) यादी करून त्याचा आराखडा तयार करावा व शासनाकडे त्वरीत पाठवावा, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्राचे वर्णन हे ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे चांदा हाच महाराष्ट्राचा खरा चेहरा आहे. हा चेहरा अपघातांमुळे विद्रूप होऊ नये. इतर जिल्ह्यांनी चंद्रपूरचा हेवा करावा, असे अपघातमुक्त चंद्रपूरचे नियोजन झाले पाहिजे. चंद्रपूर, बल्लारपूर व इतर ठिकाणी ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’सह सीसीटीव्ही बसवावे. जिल्ह्यातील सर्व ‘स्पीड ब्रेकर’वर सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘रेडियम’ आणि बोर्ड लावावे, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, अपघात कमी करण्याच्या उपाययोजनांमध्ये चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रत्येक चवथ्या मिनिटात देशात अपघातामुळे एक मृत्यु होतो. ही मनुष्यनिर्मित आपत्ती आहे. रस्ता सुरक्षेबाबत नियमांची जनजागृती आणि अंमलबजावणी ही पालकांचीसुद्धा जबाबदारी आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू म्हणाल्या, 2022 आणि 2023 मध्ये 31 डिसेंबरला चंद्रपूर जिल्ह्यात एकही अपघात आणि मृत्यु झाला नाही. बहुतांश नागरिक पोलिस दिसल्यावर हेल्मेट किंवा सिटबेल्ट लावतात. पोलिसांसाठी नव्हे तर नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी याचा वापर करावा.

मनपा आयुक्त पालीवाल म्हणाले, मोबाईल आणि गाड्या अपडेट होत आहे. मात्र त्याप्रमाणे ते वाहन चालविण्याचे ‘स्किल अपडेट’ होणे गरजेचे आहे. कॅन्सरपेक्षा जास्त मृत्यु रस्ता अपघातात होतात. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून जागरुक नागरिक निर्माण होणे गरजेचे आहे.

दारुबंदीच्या काळात कमी अपघात

अपघातांची अनेक करणे असून शकतात.  मानसिक तणाव, मद्यप्राशन करीत वाहन चालविणे अशा स्वरूपात अपघातांचे विश्लेषण केले जाते. दारुबंदीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची संख्या कमी होती. आता मात्र ती वाढल्याचे निदर्शनास येत आहे. मुख्य चौकात मद्यविक्रीचे परवाने दिले जात आहेत, ही शोकांतिका आहे, याबाबत पुढे असे परवाने देऊ नये, असे मत यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

प्रभावी जनजागृतीवर भर

रस्ता सुरक्षा अभियानात लोकांच्या हृदयाला भीडेल अशी जनजागृती करण्यात यावी. मनपा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांनी रस्ता सुरक्षा अभियान या विषयावर घोषवाक्य स्पर्धा आयोजित करावी. निबंध स्पर्धा आयोजित करून उत्कृष्ट स्पर्धकांसाठी पारितोषिक ठेवावे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.