जिल्ह्यामध्ये लाख उत्पादन वाढीसाठी प्रशासनातर्फे पुढाकार 

जिल्ह्यामध्ये लाख उत्पादन वाढीसाठी प्रशासनातर्फे पुढाकार 

           भंडारा, दि.12: जिल्ह्यामध्ये लाखेचे उत्पादन पूर्वी मोठ्या प्रमाणावर व्हायचे परंतु विक्रीसाठी बाजाराची अनुपलब्धता व इतर काही कारणांमुळे हा उद्योग लोप पावत चालला होता. परंतु आता मौजे धाबेटेकडी ता. लाखनी येथे भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व  मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने त्रिनेत्र संस्थेने भंडारा फॉरेस्ट लाख प्रोसेसिंग क्लस्टरची निर्मिती केली आहे.

        या क्लस्टर मध्ये प्रशिक्षण, खरेदी-विक्री आणि प्रक्रिया, सामूहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून एकाच छताखाली शक्य होणार आहे. सदर क्लस्टर ला 2 टन प्रतिदिन प्रमाणे दरवर्षी 600 टनापेक्षा जास्त लाखेची आवश्यकता आहे.

         त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाख उत्पादनासाठी योग्य संधी प्राप्त झाली आहे. पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन लाख उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहे.

        या अनुषंगाने मौजे धाबेटेकडी येथे कृषी उपसंचालक  पद्माकर गीदमारे, जिल्हा कृषी सल्लागार  अजय अटे, मुख्यमंत्री फेलो  निलेश साळुंके व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली व दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासमोर प्राथमिक नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. या चर्चेवेळी जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर, सहाय्यक वन संरक्षक रोशन राठोड, त्रिनेत्र संस्थेचे महेश्वर शिरभाते व जिल्ह्यातील निवडक शेतकरी उपस्थित होते.

          यावेळी पळस व कुसुम या वृक्षांवर लाख उत्पादन करण्यासाठी वनविभागातर्फे ज्या परवानगीची आवश्यकता असते त्याबद्दल शेतकऱ्यांना अवगत करण्याबाबतचे निर्देश मा. जिल्हाधिकारी यांनी वनविभागाला दिले. त्याच प्रमाणे बोर वृक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लाखेचे उत्पादन होऊ शकते.

         तसेच यासाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज लक्षात घेता योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. त्यानुसार कृषी विभाग व त्रिनेत्र संस्थेच्या माध्यमातून लाख लागवडी साठी इच्छुक शेतकऱ्यांची यादी बनवली जाणार आहे.

       तरी इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी केले आहे.