भंडारा जिल्ह्यात सारस गणनेत चार पक्षांची नोंद

भंडारा जिल्ह्यात सारस गणनेत चार पक्षांची नोंद

 

भंडारा, दि. 19 : भंडारा जिल्ह्यात सारस पक्षी गणना रविवार १८ जून ला घेण्यात आली. दरवर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सारस पक्षी गणना घेण्यात येते. यावर्षी घेण्यात आलेल्या सारस गणनेत भंडारा जिल्ह्यात चार सारस पक्षी आढळले व त्यांची नोंद घेण्यात आली.

 

जिल्ह्यात भंडारा, मोहाडी व तुमसर तालुक्यातील वैनगंगा व त्याच्या उप नद्यांच्या क्षेत्रातील संभावित सारस अस्तित्व असलेल्या १९ ठिकाणी गणना करण्यात आली. तुमसर तालुक्यातील गोंडीटोला येथील तलाव व लगतच्या शेती शिवारात सकाळी ६ वाजता चार सारस विचरण करताना आढळले. ह्यात दोन वयस्क व दोन समवयस्क सारस होते. २०१७ पासून भंडारा जिल्ह्यात नियमित सारस गणना भंडारा वन विभागाने सेव्ह इकोसिस्टेम अँड टायगर (सीट) भंडारा व सेवा संस्था, गोंदिया या स्वयंसेवी संस्था सोबत संयुक्तपणे घेतलेला आहे. २०१७ ला ३, २०१८ ला २, २०१९ ला ३, २०२० ला २, २०२१ ला २, २०२२ ला ३ सारस ची नोंद घेण्यात आली होती. ह्या वर्षी जिल्ह्यातील सारस संख्या एक ने वाढून चार झाली आहे.

 

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वयंसंज्ञानाने घेतलेल्या जनहित याचिका PIL No. 02/2021 च्या आदेशाने जिल्ह्याचा ‘सारस संवर्धन आराखडा’ बनविण्यात आलेला आहे. सदर सारस गणना जिल्हा सारस संवर्धन समिती अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर ह्यांच्या नेतृत्वात व जिल्हा सारस संवर्धन समिती सचिव माननीय उपवन संरक्षक श्री राहुल गवई ह्याच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.

 

सारस गणनेत जिल्ह्यातील ९ सारस मित्र, ३१ स्वयंसेवकांनी भाग घेतला. श्री. अनय नावंदर, परिविक्षाधीन भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी, श्री शाहिद खान, मानद वन्यजीव रक्षक,श्री नदीम खान, मानद वन्यजीवरक्षक भंडारा, श्री साकेत शेंडे, सहायक वन संरक्षक, श्री राजकमल जोब, वरिष्ठ पक्षी अभ्यासक व माजी मानद वन्यजीव रक्षक, श्री सावन बाहेकर, सेवा संस्था गोंदिया, श्री सी.जी. रहांगडाले, वन परिक्षेत्र अधिकारी तुमसर, श्री संजय मेंढे, वन परिक्षेत्र अधिकारी भंडारा, श्री मनोज मोहिते, वन परिक्षेत्र अधिकारी नाकाडोंगरी, सीट संस्था, वाइल्ड वॉच स्वयंसेवी संस्था त्यांचे प्रतिनिधी व तुमसर, जांबकांद्री, नाकाडोंगरी व भंडारा वन परिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यानी सहयोग दिला.