प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर तयार करणार ‘मिलेट्स उर्जा’ Ø 6750 किलो खिचडीचा करणार नवा विश्‍वविक्रम

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर तयार करणार मिलेट्स उर्जा

Ø 6750 किलो खिचडीचा करणार नवा विश्‍वविक्रम

चंद्रपूर, दि. 4 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मस्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागर्दर्शनात आयोजित चांदा एग्रो 2024 मध्‍ये शुक्रवार, दि. 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ‘मिलेट्स ऊर्जा’ म्‍हणजेच मिलेट्सचा वापर करून 6750 किलो पदार्थांची खिचडी तयार करून नवा विश्‍वविक्रम स्‍थापित करणार आहेत.

कृषी तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा), चंद्रपूर व कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने चांदा क्लब मैदान, चंद्रपूर येथे दुपारी 12 वाजता विष्‍णू मनोहर आत्‍मा संस्‍थेच्‍या सहकार्याने ‘मिलेट्स’ची खिचडी तयार करायला सुरुवात करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 हे वर्ष ‘मि‍लेट वर्ष’ म्‍हणून घोषित केल्‍यानंतर विष्‍णू मनोहर यांनी मिलेटच्‍या प्रचार व प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 मिलेट्सचे पदार्थ तयार करण्‍याचा निर्धार केला होता. त्‍यानुसार आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथे त्‍यांनी मिलेटचे विविध पदार्थ तयार केले आहेत.

चांदा एग्रोमध्‍ये विष्‍णू मनोहर शुक्रवारी बाजरी हे मिलेट धान्‍य व सर्व भाज्‍यांचा वापर करून पुर्णान्‍न असलेली खिचडी तयार करणार आहेत. त्‍यासाठी ते 10 फूट व्‍यासाची, 5 फूट कढई वापरणार असून त्‍याकरिता सुमारे 500  किलो लाकूड वापरला जाईल.

विष्‍णू मनोहर यांनी याआधी दिल्‍ली येथे 5 हजार किलोची ‘समरसता खिचडी’ तयार केली होती. तसेच खिचडीला राष्‍ट्रीय अन्‍न घोषित करावे, या मागणीसाठी नागपुरातील महाल भागात त्यांनी 5 हजार किलोची खिचडी तयार केली होती. नुकतेच वनवासी कल्‍याण आश्रमाच्‍या डीलिस्‍टींग कार्यक्रमासाठी त्‍यांनी 10 हजार किलो मसालेभात व नागपुरातील खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात विष्‍णू मनोहर यांनी श्री. गजानन महाराजांना 6500 किलो खिचडीचा नैवेद्य सादर केला होता.