जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरीता प्रस्ताव आमंत्रीत

जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरीता प्रस्ताव आमंत्रीत

गडचिरोली, दि.02: महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण 2001 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या कार्याचे / योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला), दिव्यांग गुणवंत खेळाडू यांना यावर्षी राज्य क्रीडा दिनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम रु. 10,000/- असे आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 च्या पुरस्कारासाठी या कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुरस्काराचे निकष : (1) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे, (2) क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्याने वयाची 30 वर्षे पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल, (3) दिव्यांग खेळाडू व गुणवंत खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षापैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे, (4) एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही, (5) एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळण्यास पात्र असणार नाही.
पुरस्कार वर्षाची गणना 1 जुलै ते 30 जुन असे राहील. उपरोक्त तिनही पुरस्काराकरीता अर्जासोबत सादर करण्यात आलेले प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे पुन्हा पुन्हा (अनेकवेळा) सादर करु नयेत. अर्जदाराने सादर केलेले कागदपत्रे व प्रमाणपत्र सत्य असल्याबाबतचे संबंधित तहसिलदार यांचेकडून ॲफीडीवेट करुन घ्यावे.
विहीत नमुन्यातील अर्ज आणि पुरस्काराच्या अटी व शर्ती आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृती भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत अर्ज प्राप्त करुन घेवून सदरचे परिपुर्ण सिल बंद अर्ज दि. 08 जानेवारी 2024 पर्यंत या कार्यालयास सादर करावेत. विहीत मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी असे जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली प्रशांत दोंदल हे कळवितात.