राष्ट्रीय खेळ प्रत्यक्षात बघण्यासाठी ग्रामीण भागातील 3 हजार विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेला भेट

राष्ट्रीय खेळ प्रत्यक्षात बघण्यासाठी ग्रामीण भागातील 3 हजार विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेला भेट

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या सुचना

चंद्रपूर, दि. 29 : तालुका क्रीडा संकुल, विसापूर, येथे सुरू असलेल्या 67 व्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा प्रत्यक्षात बघण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील 3 हजार विद्यार्थ्यांनी बल्लारपूर क्रीडा संकूल येथे भेट दिली व खेळाडूंचा थरार अनुभवला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प्रत्यक्षात बघता यावी व त्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांची खेळामध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हयातील इयत्ता 7 ते 12 च्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेस भेट देण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी केले. प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना निर्देश देऊन तालुकानिहाय 100 विदयार्थ्यांचे नियोजन करण्यात आले.

           प्रति दिवस प्रत्येक तालुका 100 विद्यार्थी याप्रमाणे दिवसाला 1500 विद्यार्थी असे दोन दिवसात एकूण 3000 विदयार्थ्यांनी या स्पर्धेस भेट दिली आहे. तसेच दिनांक 30 डिसेंबर 2023 ला 1500 विदयार्थ्यांची भेट नियोजित आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाकरीता विद्यार्थ्यांमध्ये व पालकामध्ये प्रचंड उत्साह आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार विदयार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

      तालुका स्तरावरुन प्रत्यक्ष क्रीडा संकुलापर्यंत विद्यार्थी आणण्यासाठी परिवहन विभागातर्फे बसेची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, मोटार वाहन निरीक्षक विलास ढेंगणे, सहा. मोटार वाहन निरीक्षक नरेंद्र उमाळे, चेतन गरुकर यांच्यासह विद्यार्थ्यांची ही भेट यशस्वी व्हावी, यासाठी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे,  सर्व तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी यांनी सहकार्य केले.