पीडित महिलेच्या आपबितीने ऊर्जामंत्रीही भारावले

पीडित महिलेच्या आपबितीने ऊर्जामंत्रीही भारावले

माडगी येथे दिले पीडित महिलेला मदतीचे आश्वासन

भंडारा, दि.29:- तुमसर तालुक्यातील माडगी येथे 33-11 के.व्ही. उपकेंद्राच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासमोर अचानकपणे आलेल्या एका पीडित महिलेले आपबिती सांगितली. महिलेची तक्रार घेऊन उर्जामंत्र्यांनी केवळ निवेदन स्वीकारण्याची औपचारिकता पूर्ण केली नाही तर तात्काळ कारवाईचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

दोन वर्षांपूर्वी वीज कंपनीमध्ये माडगी (जि.भंडारा) 33-11 के.व्ही. उपकेंद्राच्या उभारण्याचे काम सुरू होते. हे उपकेंद्र उभारण्याचे काम मिळालेल्या कंत्राटदाराकडे कामगार म्हणून नेतराम बुधे काम करीत होता. गेल्या 23 जून 2019 रोजी ठेकेदाराकडे काम करणाऱ्या नेतराम बुधे या कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. कर्तव्यावर असताना नेतराम बुधे यांचा प्राणांतिक मृत्यू झाल्याने नियमाप्रमाणे त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. यासंदर्भात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरीक्षकांनी संबंधित कंत्राटदाराला दोषी ठरवून पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा अहवाल दिला आहे. परंतु या अहवालावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत माडगी येथे उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला येत असल्याचे समजल्यानंतर मृतक नेतराम बुधे यांची विधवा दीपा बुधे यांनी कार्यक्रम स्थळ गाठले. मंत्र्यांचे सुरक्षा कवच असताना आपण निवेदन कसे द्यायचे, अशा मनस्थितीत असलेल्या दीपा कार्यक्रम स्थळी मंत्र्यांच्या समोर गेल्या. मंत्र्यांच्या भोवती लोकांचा गराडा असताना डॉ. नितीन राऊत यांनी दीपा बुधे यांचे निवेदन स्वीकारले. डॉ. राऊत यांनी या पीडित महिलेची आपबिती शांतपणे ऐकून घेतली. यावेळी पीडित महिलेचे डोळे डबडबले होते. या अश्रूंमध्ये मदतीची याचना होती. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या महिलेची तक्रार गंभीरपणे घेतली. दोन वर्षांपासून न्यायासाठी फिरत असलेल्या या पीडित महिलेची राज्याच्या ऊर्जामंत्र्यानी तक्रार समजून घेतली व मानवतेच्या दृष्टीकोनातून या प्रकरणात पीडित महिलेला तात्काळ मदत देण्यासाठी कारवाई सुरू करावी, असे जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.