विशेष लेख : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी“अमृत” संस्था आहे सदैव तत्पर

विशेष लेख : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठीअमृतसंस्था आहे सदैव तत्पर

     भंडारा,दि.26 : बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांच्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठलाही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था /महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुला प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, युवक / युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम कार्यक्रम इत्यादी राबविण्यात येऊन व इतर माध्यमातूनही विद्यार्थी युवक / युवती इत्यादींचा विकास घडविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी “अमृत” या नावाने नवीन स्वायत्त संस्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  सद्य:स्थितीमध्ये “अमृत”च्या अनेक योजना मंजूर झालेल्या असून त्यापैकी 6 योजना कार्यरत आहेत व इतर काही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहेत.

        “अमृत” संस्थेच्या कार्यरत योजना –

  1. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या राज्यसेवा मुख्य परीक्षा / मुलाखतीच्या तयारीसाठी उमेदवारांना अर्थसहाय्य – जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पूर्वपरीक्षा (Prelim) उत्तीर्ण होतील, त्यांना मुख्य परीक्षेसाठीच्या तयारीसाठी 15 हजार रूपये, तसेच जे उमेदवार मुख्य परीक्षा (Main) उत्तीर्ण होतील, त्यांना मुलाखतीच्या तयारीसाठी 25 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल.
  2. संघ लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा/ मुलाखतीच्या तयारीसाठी उमेदवारांना अर्थसहाय्य – जे उमेदवार संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा पूर्वपरीक्षा (Prelim) उत्तीर्ण होतील, त्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी 50 हजार रूपये; तसेच जे उमेदवार मुख्य परीक्षा (Main) उत्तीर्ण होतील, त्यांना मुलाखतीच्या तयारीसाठी 25 हजार रूपये अर्थसहाय्य दिले जाईल.
  3. कौशल्य विकासाच्या (Skills-upliftment) आधारे नोकरीची संधी – विद्यार्थी, युवक-युवती यांच्यात कौशल्य विकास घडवून आणणे व त्यांना रोजगार, नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे, यासाठी ही महत्वपूर्ण योजना आहे. विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे व विविध आस्थापना, उद्योगांशी संपर्क साधून नोकरी/ रोजगाराच्या संधी नोंदणीकृत लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयकाची भूमिका बजावणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

4.लघुउद्योग प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी नवउद्योजक -व्यावसायिक उद्योजक घडविण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन सर्वंकष प्रशिक्षण देणे, व्यावसायिक शिक्षणाकरिता internship उपलब्ध करून देणे, बँकांशी समन्वय साधून कर्जे उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करणे, तसेच सातत्याने मागोवा घेऊन समन्वयातून अडचणींचे निरसन करून, व्यवसायवृद्धीबाबत मार्गदर्शन करणे, या संदर्भात ही महत्वपूर्ण योजना आहे.

  1. कृषी उत्पन्न आधारित उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण – कृषी आधारित एमएसएमई किंवा कुटीर उद्योगांची स्थापना आणि व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे, त्यासाठी सर्वसामावेशक प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, पॅकेजिंग, प्रकल्प भेटी, उद्योजकता विकास प्रशिक्षण यासंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, तसेच कृषी उत्पन्न आधारित उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक लायसन्स, कर्जे या संदर्भात मार्गदर्शन व सहाय्य करणे, असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  2. AIIMS, IIM, IIT, IIIT येथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य.- खुल्या प्रर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मान्यता प्राप्त AIIMS, IIM, IIT, IIIT या नामांकित संस्थांमधील पदवी/ पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविका या पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी 2023-2024 या शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचा सदरचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत, दरमहा 10 हजार रूपये इतके अर्थसहाय्य देण्यात येईल.

                तरी गरजू लाभार्थ्यांनी वरील योजनांचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), 314, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे-411005, दूरध्वनी क्रमांक 9730151450 येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

        (शैलजा वाघ-दांदळे)  जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा