सर्व घटकांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो

सर्व घटकांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो

संसदेत खासदारांचे ज्या पद्धतीने निलंबन करण्यात आले त्या विरोधात विधी मंडळाच्या पायऱ्यांवर काळ्या रिबीन लावून विरोधकांचे आंदोलन

राज्य सरकारने जनतेची , शेतकऱ्यांची घोर निराशा केली; विजय वड्डेटीवार यांची टीका

नागपूर,२० :-

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी , मराठा समाज ,ओबीसी समाज जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी रीबिन बांधून निषेध आंदोलन केले.

आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोरोनाकाळात तारले होते. मात्र, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी केली. ते म्हणाले, संसदेत खासदारांचे निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी , मराठा समाज ,ओबीसी समाज यांच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर दिले नाही. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती भयावह आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी जारी केलेल्या सर्व योजना या फसव्या आहेत. हिवाळी अधिवेशनाकडे राज्यातील शेतकरी, सर्व सामन्याचे डोळे लागले होते, मात्र, या सरकारने सामान्य जनतेची , शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे अशी खरमरीत टीका करत श्री वड्डेटीवार यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी फीत बांधून सरकार विरोधात निषेध आंदोलन केले. याप्रसंगी सर्व विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते.

विधिमंडळ परिसरात विरोधक विविध प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत” कापूस सोयाबीन भाव दिला का ? नाही, नाही, नाही. भाताला भाव मिळाला का?नाही, नाही, नाही, धानाला भाव मिळाला का ? नाही, नाही, नाही असं म्हणत
सगळ्या घटकावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

नागपूर येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केले.हाताला काळी फीत बांधून, हातात घोषणांचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला.