मकर संक्रांती-भोगी सण ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा होणार

मकर संक्रांती-भोगी सण ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा होणार

 

भंडारा, दि. 14 : पौष्टिक तृणधान्याचे महत्व जनतेपर्यंत पोचविण्यासाठी जिल्ह्यात “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरे करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच ‘मकर संक्रांती- भोगी हा सणाचा दिवस दरवर्षी पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

पौष्टिक तृणधान्य दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कृषी सहाय्यक प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, आदी कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. ज्या विभागामार्फत बालके, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगारांना उपहारगृहात फराळ, माध्यान्ह भोजन पुरविण्यात येते, अश्या विभागांनी या दिवशी त्यांच्या आहारामध्ये पौष्टिक तृणधान्यांचा जाणीवपूर्वक वापर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.