चंद्रपूर मनपा दिनदर्शिकेद्वारा घरोघरी पोहोचणार

चंद्रपूर मनपा दिनदर्शिकेद्वारा घरोघरी पोहोचणार मनपाच्या सेवा, उपक्रम व शासकीय योजनांची माहिती .
वॉर्ड सखींद्वारे दिनदर्शिकेचे मोफत वितरण

चंद्रपूर १८ डिसेंबर –  मावळते वर्ष सरून नवीन वर्षात पदार्पण करतांना दिनांकाची माहीती घेतांना आपल्याला दिनदर्शिकेची गरज भासते. सध्याच्या डिजिटल युगात सुद्धा दिनदर्शिका आपले स्थान अबाधित राखून असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिनदर्शिका २०२४ प्रकाशित करण्यात आली असुन यात तारीख, वार सण,विवाह मुहुर्त,तिथी इत्यादींसोबतच महानगरपालिकेचे उपक्रम,विशेष कार्ये व नागरिकांना उपयोगी पडणाऱ्या सेवांची माहीती सुद्धा दिली गेली आहे.
एकुण १२ पानांच्या असलेल्या या दिनदर्शिकेत मनपाचे सर्वच महत्वाचे विभाग व त्यांची कामे, शासनाची विविध योजना,उत्कृष्ट कार्ये यांचा समावेश करण्यात आला असुन मनपा क्षेत्रात ८० हजाराच्या जवळपास असलेल्या प्रत्येक घरी दिनदर्शिका पोहचावी या दृष्टीने ६९ वॉर्ड सखींद्वारे दिनदर्शिकेचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
यात नागरिकांना उपयोगी पडणारे जिल्ह्यातील विविध विभागांचे संपर्क क्रमांक जसे – जिल्हाधिकारी कार्यालये, महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका,नगर परिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती,वीज वितरण,परिवहन मंडळ,जिल्हा प्रशासन,पोलीस स्टेशन इत्यादी अनेक महत्वाच्या विभागांचे कार्यालयीन संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तसेच मनपाची तक्रार निवारण यंत्रणा, मनपाचा स्थापना दिन,नायलॉन मांजाचे दुष्परिणाम,डेंग्युविषयी घ्यायची आवश्यक काळजी,पीएम स्वनिधी, योजना दिव्यांग कल्याण धोरण,प्लास्टीक निर्मूलन आवाहन, उन्हाळ्यास बचावासाठी करावयाची उपाययोजना,विकल्प थैला,रेड टँकर,मतदार नोंदणीचे आवाहन,माणुसकीची बँक,मालमत्ता कर नियमित भरणे त्यासाठी ऑनलाईन युपीआय पर्यायांची माहिती,आयुष्मान भारत योजना,स्वनिधी से समृद्धी कार्यक्रम,आयुष्मान भवः,रेन वॉटर हार्वेस्टींग योजना,विवाह नोंदणीस लागणारी आवश्यक कागदपत्रे,राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम यांची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय मालमत्ता कर भरण्यास सोयीचे व्हावे यादृष्टीने प्रत्येक पानावर QR कोड सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रम,सेवा,शासकीय योजना,आपत्ती प्रसंगी आवश्यक ते संपर्क क्रमांक,मनपाचे संकेतस्थळ,सोशल मिडिया पेज यांची माहिती यात दिली गेली असल्याने ही दिनदर्शिका सर्वांना मार्गदर्शक ठरेल’ – आयुक्त विपीन पालीवाल