थंडीत बेघरांना मनपाच्या निवारागृहाचा आश्रय

थंडीत बेघरांना मनपाच्या निवारागृहाचा आश्रय

चंद्रपूर १८ डिसेंबर : उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास १५ बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली.
हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढत आहे त्यानुसार नागरी बेघरांना निवाऱ्यात आणण्याची सोय करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. रात्रीच्या सुमारास कुणी रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली, रेल्वेस्टेशन, बसस्थानकात झोपू नये यासाठी महापालिकेने कस्तुरबा रोड,आझाद बगीच्या जवळील आसरा बेघर निवारा केंद्र तयार केले आहेत.
शासन निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे नागरी भागातील बेघरांसाठी दर बुधवारी सर्वेक्षण करण्यात येते. बेघर निवारा केंद्राची माहिती जरी सर्वांना असली तरी अनेक गरजू स्वतःहुन या केंद्रापर्यंत येत नाही. त्यामुळे मनपा राष्ट्रीय नागरी उपजीविका कर्मचाऱ्यांनी रात्री वरोरा नाका पूल,बसस्थानक, रेल्वेस्टेशन, उड्डाणपुलांखाली बेघरांचा शोध घेतला. त्यात आढळून आलेल्यांना बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. या बेघरांना थंडीपासुन संरक्षण मिळण्याचे दृष्टीने त्यांना ब्लॅंकेट,चादर,सतरंजी,पलंग,स्वेटर,चहा व जेवणाची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली.