वाढदिवस विशेष! कोण आहेत शिवानीताई वडेट्टीवार?

वाढदिवस विशेष! कोण आहेत शिवानीताई वडेट्टीवार?

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे एक नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या इतकीच शिवानीताई वडेट्टीवार यांची ओळख नाही. विजय वडेट्टीवार यांची मुलगी असल्याचा त्यांना अभिमान नक्कीच आहे. पण, राजकारणात स्वत:ची एक वेगळी भूमिका त्यांची आहे. राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांनी २०१९ साली चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस चिटणीसपदाची निवडणूक लढविली. पक्षात युवक-युवतींच्या पाठिंब्यावर त्या निवडून आल्या. त्यांची धडाडी, अभ्यासूवृती, नेतृत्व कौशल्य पाहून पुढच्याच वर्षी पक्षात त्यांना प्रदेश पातळीवर बढती मिळाली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या चिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली. पक्षाच्या युवती सेलच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. सध्या त्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस असून, त्यांच्याकडे निवडणूक तयारी समितीत त्यांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विजयक्रांती कामगार संघटनेच्या त्या अध्यक्षा आहेत. पक्षाच्या सर्व कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई महाविद्यालयातून त्यांनी अकाउंटिंग अ‍ॅण्ड फायनान्स या विषयात पदवी संपादन केली आहे. नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून एलएलबी पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे. उच्चशिक्षित युवा नेत्या म्हणून त्या संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत.