मनपा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर 37 अधिकारी / कर्मचा-यांचे समावेशन

मनपा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर 37 अधिकारी / कर्मचा-यांचे समावेशन

Ø अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाची मान्यता

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित

 

चंद्रपुर, दि. 19 : चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील 37 अधिकारी व कर्मचारी यांचे समावेशन, अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्ती देण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामध्ये चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तर 33 कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्ती देणार आहेत. महापालिकेतील रित्त पदांबाबत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

 

चंद्रपूर महानगरपालिका येथील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मागील अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. महानगरपालिकेच्या मान्यताप्राप्त आकृतिबंधातील 4 एकाकी पदावर सेवेत समावेशन करण्याबाबत तसेच उर्वरित 33 कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे निर्माण करून त्यावर समावेशन करण्याच्या संदर्भात अधिकारी व कर्मचारी यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकारी व कर्मचारी यांना मनपाच्या आस्थापनेवर समावेशन करण्याकरिता मुंबई विधान भवन येथे तातडीची सभा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.

 

त्यानुसार मनपा चंद्रपूर तर्फे आर.सी.एच आणी जी.आय.ए यांचा मनपाच्या आस्थापनेवर समावेशन करण्याकरिता स्वत्रंत प्रस्ताव प्रधान सचिव, नगर विकास विभाग यांच्याकडे दिनांक 31.10.2022 व दिनांक 07.12.2022 अन्वये सादर करण्यात आला. मनपा चंद्रपूर येथे आरोग्य विभागात कार्यरत 37 अधिकारी व कर्मचारी यांना मनपाच्या आस्थापनेवर समावेशन करण्याकरिता दिनांक 16.06.2023 रोजी नगर विकास विभाग कार्यालय, मंत्रालय, मुंबई येथून शासन निर्णय निगर्मीत करण्यात आला आहे.

 

चंद्रपूर महानगरपालिकेतील राष्ट्रीय प्रजनन व बाल संगोपन आरोग्य कार्यक्रम फेज -2 या कार्यक्रमांतर्गत मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी (राष्ट्रीय/राज्य आरोग्य कार्यक्रम)-1पद, वैद्यकीय अधिकारी (राष्ट्रीय/राज्य आरोग्य कार्यक्रमाव्यतिरिक्त (जन्म मृत्यू व विवाह नोंदणीसह)-1 पद, वैद्यकीय अधिकारी (पी.सी.पी.एन.डी.टी, एम.टी.पी आदी कायदे अमंलबजावणी)-1 पद, वैद्यकीय अधिकारी (महाराष्ट्र सुश्रुषागृह नोंदणी अधिनियम आदी कायदे अमंलबजावणी)-1 पद या चार पदांवर 4 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आकृतीबंधातील मंजूर व रिक्त पदांवर शासन मान्यता देण्यात आली आहे. तसेच व्यवस्थापक-1 पद, पी.एच.एन-2 पदे, ए.एन.एम 22 पदे, अकाउंटंट कम डाटा एन्ट्री ऑपरेटर-1 पद, लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर-4 व शिपाई-3 पदे अशा एकूण 33 अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी महानगरपालिका स्तरावर अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना नियुक्ती देण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.

 

मनपाच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर समावेशन करण्यासंदर्भात शासन निर्णय निगर्मित झाल्याने अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.