स्पर्धा कालावधीत समित्यांनी जबाबदारी ओळखून कामे पार पाडावी-जिल्हाधिकारी विनय गौडा

स्पर्धा कालावधीत समित्यांनी जबाबदारी ओळखून कामे पार पाडावी-जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना

चंद्रपूर, दि.05: 26 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे उत्कृष्ठ आयोजन, व्यवस्थापन व कामकाज उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. सदर समित्यांना दिलेली जबाबदारी ओळखून कामे पार पाडण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सदर समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतांना ते बोलत होते.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपिन पालीवाल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अजय चरडे, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, कार्यक्रम व्यवस्थापक सिद्धार्थ मेहता आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू, संघ व्यवस्थापक, खेळाडूंचे पालक, कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक समितीने आपल्या कार्याची जबाबदारी ओळखून स्पर्धा कालावधीत अनुषंगिक कामे पार पाडावीत. आयोजन समितीने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट होण्याकरीता संपूर्ण नियोजन करावे. खेळाडूंची नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन डेक्सची उपलब्धता ठेवावी. स्पर्धेकरीता येणाऱ्या खेळाडूंसाठी निवास व्यवस्था करणे, आवश्यकतेनुसार मनुष्यबळांची उपलब्धता ठेवावी. मदत कक्षाद्वारे खेळाडूंना सर्व माहिती उपलब्ध होईल याअनुषंगाने माहिती द्यावी तथा कॉलसेंटर उभारावे. स्वच्छता समितीने परिसर स्वच्छता, भोजनाचा परीसर तसेच निवासव्यवस्थेसह, क्रीडांगणाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. याकरीता बल्लारपूर नगरपालिका व चंद्रपूर महानगरपालिकेने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे.

जिल्हाधिकारी श्री. गौडा पुढे म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी डॉक्टरांच्या चमूसह ॲम्बुलन्स उपलब्ध ठेवाव्यात. भोजन समितीने खेळाडूंच्या तसेच मान्यवरांच्या भोजनासाठी कुपनची व्यवस्था ठेवावी. येणाऱ्या खेळाडूंकरीता वाहतूक व्यवस्था तसेच वाहनासाठी पार्किंग व्यवस्था ठेवावी. सुरक्षा समितीने सुरक्षा यंत्रणा अद्यावत ठेवाव्या. वनअकादमी, सैनिक शाळा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या निवास व्यवस्थेच्या तसेच क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी पोलीसांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सुचना दिल्या तसेच प्रत्येक समितीने आपल्या कार्याची जबाबदारी ओळखून स्पर्धा कालावधीत अनुषंगिक कामे पार पाडावीत, असेही ते म्हणाले.

या आहेत समित्या:

आयोजन समिती, उद्घाटन समिती, स्वागत समिती, निवास व्यवस्था समिती, मदत कक्ष, भोजन समिती, क्रीडा कार्यक्रम व तक्रार निवारण समिती, स्थानिक पर्यटन समिती, प्रसिद्धी आणि पायाभूत सुविधा समिती, वाहतूक व्यवस्था समिती, सांस्कृतिक कार्य समिती, सुरक्षा समिती स्वच्छता समिती आदी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.