जिल्ह्यात 64 अमृत सरोवरांची कामे पुर्ण…

जिल्ह्यात 64 अमृत सरोवरांची कामे पुर्ण

· उर्वरीत कामे जुन अखेरपर्यंत पुर्ण होणार

 

भंडारा दि. 24: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात अमृत सरोवर योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जलाशये, तलाव निर्मिती किंवा त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामध्ये जिल्ह्यात एकूण 81 अमृत सरोवर निर्मीतीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामधील 64 अमृत सरोवरांची कामे पुर्ण झाली असून केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवर माहिती टाकण्यात आली आहे.

 

या योजनेमध्ये अमृत सरोवर निर्मीतीसाठी 1 एकर किंवा त्यापेक्षा मोठे क्षेत्र अपेक्षित आहे. या सरोवरांची साठवण क्षमता 10 हजार क्युबिक मिटर असेल. त्यामध्ये उद्दिष्टा पेक्षा अधिक साध्य करण्यात येणार आहे. जुन अखेरपर्यंत 81 अमृत सरोवरांची कामे पुर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यामध्ये जुन्या सरोवरांची दुरूस्ती देखील करण्यात येत आहे. 75 जलस्त्रोतांचा विकास हे या योजनेमागचे प्रमुख उद्दीष्टे आहे. याबाबत सनियंत्रण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे कार्यरत असून या अभियानाचे सदस्य सचिव जिल्हा संधारण अधिकारी सुभाष कापगते हे आहेत. शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचन उपलब्ध करून देण्यावर या योजनेतून भर देण्यात येत आहे.

 

तलाव हे पर्यावरणाच्या संवर्धनात मोलाची भूमिका बजावत असतात. या तलावांचे संवर्धन करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे यासाठी केंद्र शासनाने अमृत सरोवर ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव तयार करणे आणि तलावांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे, शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणे, पाण्यातील जलसृष्टी वाचवणे तसेच तलावांद्वारे पर्यटनाला चालना देणे आदी उद्देशाने अमृत सरोवर योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे.