आज चंद्रपूरातील सिपेट संस्थेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण

आज चंद्रपूरातील सिपेट संस्थेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण

 

चंद्रपूर, दि. 10: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नागपूर येथून चंद्रपूरातील तडाली औद्योगिक वसाहतीत असलेल्या सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट) या संस्थेचे दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार आहे.

 

सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट) ही भारत सरकारच्या रसायन व पेट्रोरसायन विभाग तसेच रसायन व खते मंत्रालयाची मान्यता प्राप्त असलेली ISO 9001:2015 प्रमाणित नामांकित संस्था आहे. सिपेट ही संस्था संपूर्ण भारतात प्लास्टिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तसेच प्लास्टिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेष तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मनुष्यबळ विकासाचे काम करत असून प्लास्टिक क्षेत्रातील आणि संबंधित उद्योगांच्या विकासासाठी प्रशिक्षण, तांत्रिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहे.

 

महाराष्ट्रात चंद्रपूर येथे प्लास्टिक आणि संबंधित उद्योगांच्या क्षेत्रातील मानव संसाधन व कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी आणि या क्षेत्रातील उद्योगांना तांत्रिक सहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी सिपेट संस्था सुरु करण्यात आलेली आहे.

 

सद्यस्थितित सिपेट, चंद्रपुर येथे शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता डिप्लोमा कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या डिप्लोमा कोर्सेसमध्ये तीन वर्ष कालावधी असलेले डिप्लोमा इन प्लास्टिक्स टेक्नोलॉजी (DPT) आणि डिप्लोमा इन प्लास्टिक्स मोल्ड टेक्नोलॉजी (DPMT) हे दोन कोर्सेस उपलब्ध आहेत. डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच विदेशात देखील बहुराष्ट्रीय प्लास्टिक उद्योग (मल्टीनेशनल प्लास्टिक इंडस्ट्रीज) मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच, सिपेट चंद्रपूरमधून कौशल्य विकास योजनांतर्गत आतापर्यंत जवळपास 4280 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. आणि त्यापैंकी 3722 म्हणजेच 87 टक्के विद्यार्थ्यांना टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम लि., वॅरोक पॉलीमर प्रा.लि., जाबील सर्किट इंडिया प्रा.लि., आरसी प्लास्टो प्रा.लि. या व इतर नामांकित कंपन्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

 

बदलत्या काळानुरूप प्लास्टीक हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक बनलेला आहे. सध्यस्थितीत- ऑटोमोबाईल, इलेक्ट्रोनिक्स, इलेक्ट्रिकल,पाकॅसिंग, मेडीकल इ. सर्वच क्षेत्रात प्लास्टिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांचे अनन्य साधारण महत्व आहे. तरी चंद्रपूर व विदर्भ प्रांतातील विद्यार्थ्यांना सिपेटच्या माध्यमातून प्लास्टिक अभियांत्रिकी सारख्या आधुनिक व नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमातून स्वतःचे उज्वल भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.