वन अकादमीमध्ये 18 महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात

वन अकादमीमध्ये 18 महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात

चंद्रपूर, दि. 30 : वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन, प्रबोधिनी,चंद्रपूर येथे दि.29 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड राज्यातील नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसाठी 18 महिने प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रशिक्षणामध्ये  छत्तीसगड राज्यातील एकूण 40 वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये 27 पुरुष आणि 13 महिला वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थ्याचा समावेश आहे. यावेळी, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्घाटन सोहळयास उपस्थित राहून नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणार्थींना संबोधित करतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, मौल्यवान नैसर्गिक वारसाचे रक्षण व जतन करण्याची जबाबदारी वनांचे रक्षक म्हणून आपणावर आहे, असे सांगितले. शेतकरी, वने व मत्स्यव्यवसाय आणि मानवतेला टिकवून ठेवण्यासाठी त्यांची अपरिहार्य भूमिका या तीन एफ (F) परस्पर संबंधांवर त्यांनी भर दिला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशिक्षणार्थींना आपल्या पर्यावरणाचे भावी संरक्षक म्हणून संबोधून शुभेच्छा दिल्या.

वन प्रबोधिनीचे संचालक एम.एस. रेड्डी, यांनी 18 महिन्यांचे प्रशिक्षण अभ्यासक्रमाची ओळख करून दिली. तसेच वन प्रबोधिनीला अत्याधुनिक संस्थेत रूपांतरीत करण्यासाठी वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. महाराष्ट्रातील 50 कोटी वृक्षारोपण मोहिमेसह राज्यभरातील इतर पर्यावरणीय उपक्रमांचे नेतृत्व करण्यात वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची प्रशंसा केली. यावेळी, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थी अमितेश सिंग परिहार यांनी छत्तीसगडच्या जंगलांचे आणि त्यांच्या संवर्धन धोरणांचे वर्णन करून छत्तीसगड राज्याविषयी माहिती दिली. तसेच सदर प्रशिक्षणार्थींनी वन प्रबोधिनीच्या माध्यमातून देशातील सर्वोत्तम वन अधिकारी बनण्याची इच्छा व्यक्त केली.

प्रशिक्षणार्थी त्यांच्या भूमिकेला नवीन उद्देशाने आणि पर्यावरण संवर्धनासाठी अतूट बांधिलकीने स्विकारण्यास तयार असल्याचे वन प्रबोधिनीचे संचालक एम.एस. रेड्डी म्हणाले.