जागतिक एड्स दिन : जिल्ह्यात जनजागृती रॅलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक एड्स दिन : जिल्ह्यात जनजागृती रॅलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन

            चंद्रपूर, दि.30: राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातंर्गत एचआयव्ही/एड्स विषयीची माहिती व त्यासंदर्भात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यासाठी आरोग्य प्रशासनामार्फत तसेच जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचे घोषवाक्य (आता नेतृत्व व आघाडी समुदायाची-वाटचाल एड्स संपवण्याच्या दिशेने) असे आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.  1 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये मातेकडून होणाऱ्या बाळाला एच.आय.व्ही./एड्स संसर्गापासून प्रतिबंध करणे याबाबतचा संदेश जास्तीत नागरिकांपर्यंत पाहोचवावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी केले आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत एचआयव्ही विषयक समुपदेशन व एचआयव्ही चाचणी सुविधा नि:शुल्क देण्यात येते. त्याचबरोबर गुप्तरोग्याकरीता मोफत औषधोपचार व अन्य समुपदेशक सुविधा डिएसआरसी केंद्रामार्फत देण्यात येत असून एआरटी उपचार केंद्रातून देण्यात येतात. त्याचप्रमाणे, अतिजोखिम वर्तन गट, ट्रकर्स, स्थलांतरित कामगार व ग्रामीण भागाकरीता अनुदानित संस्थेद्वारे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत एक जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर 14 आयसीटीसी, गुप्तरोगाकरीता जिल्हास्तरावर एक सुरक्षा क्लिनीक केंद्र, औषधोपचारासाठी 2 एआरटी केंद्र, 6 लिंक एआरटी केंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर 62 एफ-आयसीटीसी, जिल्हाभरात 110 पिपीपी सेंटर, 5 ब्लड स्टोरेज, ग्रामीण भागातील 100 गावासाठी 1 लिंकवर्कर स्कीम (प्रकल्प), 1 विहान प्रकल्प, 1 ट्रकर्स प्रकल्प, स्थलांतरीत कामगारांसाठी 2 मायग्रंट प्रकल्प व एचआरजी कोअर ग्रुपसाठी 1 प्रकल्प अशा सुविधा केंद्राची निवड करण्यात आली आहे.

 विविध स्पर्धांसह कार्यक्रमाचे आयोजन :

जिल्ह्यात तालुकास्तरावर असलेल्या आयसीटीसी केंद्र व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत विविध जनजागृतीपर स्पर्धा, पथनाट्य, आरोग्य तपासणी शिबिरे, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, विविध गटासोबत कार्यशाळा तसेच जनजागृती रॅली तसेच सर्व तालुक्यामध्ये एच.आय.व्ही. बाधितांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रम, तसेच एच.आय.व्ही.सह जगणाऱ्या व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयसीटीसीच्या माध्यमातून एचआयव्ही/एड्स तपासणी:

 एचआयव्ही/एड्स बाबतीत जिल्ह्याची सद्यस्थिती पाहता, सन 2023-24 या कालावधीत माहे, एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात कार्यरत आयसीटीसीच्या माध्यमातून 39 हजार 371 नागरीकांची सामान्य तपासणी तर 23 हजार 829 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली. यापैकी सामान्य तपासणीत 152 इतके एचआयव्ही बाधित आढळून आले. तसेच गरोदर माता तपासणीमध्ये 19 इतके एचआयव्ही बाधित आढळून आले. या सर्व बाधितांना औषधोपचारावर आणण्यात आले आहे.

                 जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.