जिल्हाधिका-यांकडून रस्ता सुरक्षा समितीचा आढावा

चंद्रपूर जिल्ह्यात रस्ते अपघात व मृत्युच्या संख्येत घट

Ø जिल्हाधिका-यांकडून रस्ता सुरक्षा समितीचा आढावा

 

चंद्रपूर, दि. 14 : दरवर्षी रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात नागरिकांना जीव गमवावा लागतो. जिल्ह्यातील अपघातांची संख्या व त्यात होणाऱ्या मृत्युची संख्या कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे गठन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पहिल्या पाच महिन्यात (जानेवारी ते मे 2023) जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत 17 टक्क्याने तर मृत्यूंच्या संख्येत 29 टक्क्याने घट झाली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सदर माहिती देण्यात आली. याबाबत जिल्हाधिका-यांनी पोलिस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग व सा.बा. विभागाचे तसेच नियमांचे पालन करणा-या नागरिकांचेही कौतुक केले आहे.

 

सन 2022 मध्ये जानेवारी ते मे या पहिल्या पाच महिन्यात जिल्ह्यात 415 अपघात झाले होते. तर यावर्षी अपघातांची संख्या 355 आहे. अपघाताच्या संख्येत 17 टक्क्यांची घट झाली आहे. 2022 मध्ये याच कालावधीत 218 जणांचा मृत्यु झाला होता. 2023 मध्ये मृत्युचा आकडा 154 आहे. मृत्युच्या संख्येत 29 टक्के घट झाली असून गतवर्षीच्या तुलनेत 64 लोकांचे जीव वाचले आहेत. तसेच जानेवारी ते मे या कालावधीत 2022 मध्ये ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या 216 केसेस करण्यात आल्या होत्या. 2023 मध्ये या केसेसची संख्या 3817 (1600 टक्के वाढ) वर गेली आहे. 2022 मध्ये सिटबेल्ट न लावल्याबद्दल 4608 केसेस, 2023 मध्ये ही संख्या 10276 वर (123 टक्के वाढ), गतवर्षी हेल्मेट न घालणे 7099 केसेस, 2023 मध्ये 15668 केसेस (120 टक्के वाढ) तसेच 2022 मध्ये एकूण मोटर वाहन केसेसची संख्या 41076 होती. तर यावर्षी पहिल्या पाच महिन्यात ही संख्या 56556 वर (37.68 टक्के वाढ) वर गेली आहे.

 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. शाळा – महाविद्यालयात विशेष सत्र आयोजित करून विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा कायद्याबाबत माहिती द्यावी. आपल्या क्षेत्रात अपघात झाला असेल तर पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिका-यांसोबतच संबंधित सा.बा. विभागाच्या उपअभियंत्याने अपघातस्थळी जाणे आवश्यक आहे. शहरात ट्राफिक पार्क करीता जागा निश्चित करावी. रस्त्यालगत होणा-या अनधिकृत पार्किंगबाबत संबंधित विभागाने कडक कारवाई करावी. तसेच जिल्ह्यात अपघाताचे ब्लॅकस्पॉट निश्चित करून संयुक्त सर्व्हेक्षण करावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

 

वीस कलमी सभागृहात बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलिस निरीक्षक रोशन यादव, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, डॉ. अविष्कार खंडाते यांच्यासह दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व नगर परिषद / नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.