स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी घेतले महत्वपूर्ण निर्णय   – शहरातील घनकचरा संकलन कंत्राट रद्द; मनपा करणार स्वच्छतेचे नियोजन

स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी घेतले महत्वपूर्ण निर्णय 
– शहरातील घनकचरा संकलन कंत्राट रद्द; मनपा करणार स्वच्छतेचे नियोजन
चंद्रपूर, ता. ११ मार्च : शहरातील घर ते घर घनकचरा संकलन व व्यावसायिक ठिकाणावरुन कचरा संकलित करणे ( Door To Door Collection ) व कंटेनर पर्यंत पोहचविण्याचे काम हे सेंटर फॉर डेव्हलपमेंट, जयपूर यांच्याकडे आहे. महानगरपालिकेने वारंवार दिलेल्या सुचनांचे पालन कंत्राटदार करीत नसल्याने सदर कंत्राट रद्द करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. ११ मार्च रोजी मनपाच्या राणी हिराई सभागृहात सभापती संदीप आवारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा घेण्यात आली.


घर ते घर घनकचरा संकलन व व्यावसायिक ठिकाणावरुन कचरा संकलन ( Door To Door Collection ) व कंटेनर पर्यंत पोहचविण्याचे काम सेंटर फॉर डेव्हलपमेन्ट, जयपूर यांच्यामार्फत सुरु आहे. स्थायी समिती ठराव क्रमांक ३०, दिनांक ०७/०७/२०२० अन्वये उपरोक्त काम १९ महिन्यापासून म्हणजेच दिनांक ०८/०७/२०२० पासून मुदतवाढ देऊन सुरु आहे. कंत्राटदार वारंवार वाढीव दराची मागणी करीत आहे. वाढ देणे शक्य नाही. या उपरोक्त कामातील कार्यरत २३८ कंत्राटी कुशल, अकुशल कामगारांना किमान वेतनाचे दर दिनांक २४/०२/२०१५ च्या महाराष्ट्र शासन अधिसुचनेनुसार वाढीव दर दिल्यामुळे कामाच्या एकूण खर्चात मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे.

उपरोक्त कामाच्या ई-निविदा प्रक्रियेबाबत मा. न्यायालयाचे आदेश दिनांक १२/१०/२०२१ हे मनपा हिताविरुद्ध असल्याने मा. सर्वोच्च न्यायालयात आदेशाविरुद्ध आव्हान देण्याची बाब विचाराधीन आहे. नवीन कामाचे कार्यादेश देण्यास किती कालावधी लागेल, हे निश्चित नाही. या कामाबाबत महानगरपालिकेचे आर्थिक हित, कामाची गुणवत्ता इत्यादी बाबी विचारात घेता महानगरपालिका स्तरावर नियोजन करणे योग्य आहे. मे. सेंटर फॉर डेव्हलपमेंन्ट कम्युनिकेशन, जयपूर यांचे काम मागील १९ महिन्यांपासून मुदतवाढीवर दिर्घ कालावधीकरीता काम सतत सुरु ठेवणे प्रशासकिय व आर्थिक दृष्ट्या योग्य नाही. त्यांच्या कामाच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत असल्याने त्यांना नोटीस देऊन विचारणा केली. मात्र, समाधानकारक खुलासा प्राप्त होत नसून कामामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होताना दिसून येत नाही. तसेच कामामध्ये दरवाढ करून देण्याची मागणी वारंवार मागणी करण्यात येत आहे. कामगार वारंवार काम बंद करण्याचे  धोरण अवलंबत आहे. शासनांकडून प्राप्त होणारे १५ व्या वित्त आयोगाचे अनुदान नागरी घनकचरा व्यवस्थापन करीता २५% (टक्के) मर्यादित ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे योग्य आहे.

मे सेटर फॉर डेव्हलपमेंन्ट कम्युनिकेशन जयपूर यांचे काम बंद करुन महानगरपालिका स्तरावर नियोजन करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. त्यासाठी महानगरपालिकेकडे सध्यस्थितीत शासनाकडून मंजूर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प (DPR) मधील ११ टाटा ऑटो टिप्पर, २ जेसीबी (बँकहो लोडर) उपलब्ध असून, कंत्राटी मजुरांचे ई – निविदा दर मंजुर आहे. तसेच घनकचरा उचलण्याकरीता प्रती ट्रिप प्रमाणे ट्रॅक्टरचे ई – निविदा दर उपलब्ध आहे. या मनुष्यबळ व साधन सामुग्रीतुन ई – निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कामाची पर्यायी व्यवस्था करावी, असेही सभापती संदीप आवारी यांनी सूचित केले. 

उन्हाळ्यासाठी टँकरची पर्यायी व्यवस्था ठेवा

एप्रिल महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढून पाणीटंचाई होण्याची शक्यता असते. शहरात मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. पाणीटंचाईच्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी भाड्याने टँकरची पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचना सभापतींनी दिल्या.

पावसाळा सुरू होण्याआधी जेसीबीची व्यवस्था करा

पावसाळा सुरू होण्याआधी उन्हाळ्यातच सर्व नाल्यांची सफाई करण्यात यावी, शहरातील मोठ्या नाल्यांची तसेच लहान नाल्यांची साफसफाई करून मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने झाडेझुडपे, गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात यावा, यासाठी नवीन जेसीबी मशीन खरेदी करण्यात येईल. मात्र, सध्या पर्यायी व्यवस्था म्हणून भाडेतत्वावर घेण्याची सूचना सभापतींनी दिली.

फवारणी पंप इ-निविदा दरास मान्यता

चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील १७ प्रभागासाठी डास प्रतिबंधात्मक फवारणी आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी पंप, देखभाल दुरुस्तीसह जंतुनाशक औषधी व कामगारासह इ-निविदा दरास मान्यता देण्यात आली.