गायी- म्हशींमधील वंध्यत्व निवारणासाठी “राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान”

गायी- म्हशींमधील वंध्यत्व निवारणासाठी राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान

२० नोंव्हेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान अभियान      

        भंडारा,दि.23 :जागतिक पातळीवर दुध उत्पादनात देशाचा प्रथम क्रमांक आहे. सन २०२१-२२ मधील आकडेवारीनुसार प्रतिदिन प्रतिव्यक्ती दुधाची उपलब्धता ४४४ ग्रॅम असून, राज्यातील दूध उपलब्धता ही ३१५ ग्रॅम आहे. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत राज्यातील प्रतिदिन प्रतिव्यक्ती दूधाची उपलब्धता १२९ ग्रॅमनी कमी आहे. देशपातळीवर राज्याचा दूध उत्पादनात सहावा क्रमांक असून, सन २०१९ च्या २० व्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये एकूण १,९५,९५,९९६ गायी-म्हशी असून त्यापैकी ५६,२२,५२७ गायी व ३२,८१,६५७ म्हशी पैदासक्षम आहेत.

         सद्यस्थितीत राज्यातील पैदासक्षम गायी-म्हशींच्या संख्येच्या तूलनेत केवळ १८ टक्के गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन केले जाते. राज्यात वंध्यत्व असलेल्या व माजावर न येणाऱ्या गायी-म्हशींची संख्या जवळपास ४० लक्ष आहे. राज्यातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भंडाऱ्यातील दूधाळ गायी- म्हशींची दूध उत्पादनक्षमता कमी आहे.

         तसेच, दूध उत्पादनात नसलेल्या म्हणजेच भाकड जनावरांची संख्या सुध्दा मोठया प्रमाणात आहे. दुधाळ जनावरे भाकड राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले वंध्यत्व हे होय. सर्वसाधारणपणे ४० ते ६० टक्के दुधाळ जनावरांमध्ये वंध्यत्व किंवा माजावर न येणे या समस्या दिसून येतात. राज्यातील दूधाचे उत्पादन वाढविण्याकरीता गायी-म्हशींची प्रजननक्षमता वाढविणे गरजेचे आहे.

          यासाठी प्रामुख्याने गायी-म्हशींची वाढ आणि त्यांचे शारीरिक वजन अपेक्षित मापदंडानुसार होणे आवश्यक आहे. शारीरिक वजनवाढ आणि पशुप्रजननाचा थेट संबंध असून, अपेक्षित शारीरिक वजनवाढ असणाऱ्या पशुधनामध्ये उच्च प्रजननक्षमता दिसून येते. सर्वसाधारणपणे कालवडी २५० कि. ग्रॅ. तर पारडया २७५ कि. ग्रॅ. शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवितात. सर्व पशुपालकांनी पशुधनाचे शारीरिक वजन नियंत्रित करण्यासाठी वजनवाढीची साप्ताहिक नोंद त्यांच्याकडे ठेवणे गरजेचे आहे.

         ज्या पशुधनामध्ये सलग तीन आठवडे शारीरिक वजन नोंदीतून शरीरीक वजन घट दिसून येते, अशा पशुधनामध्ये प्रजननाची कमतरता आणि वंध्यत्वाची बाधा असण्याची दाट शक्यता असते. शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गायी-म्हशींमध्ये असलेल्या उद्भवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी जिल्हयामध्ये २० नोंव्हेंबर,२०२३ ते दि. १९ डिसेंबर,२०२३ या कालावधीत “राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान” संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबविण्यात येणार आहे.

         शारीरिक वजनवाढीसाठी पशुधनास दररोज १ कि. ग्रॅ. पशुखाद्य, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, मुक्तसंचार व्यवस्थापनात व्यायम आणि प्रतिदिन ५० ग्रॅम खनिजमिश्रण, जंतनाशके आणि भरपूर पिण्यासाठी पाणी याचे नियोजन करणे आवश्यक आहे. शेण तपासणीनंतर जंत प्रादुर्भाव दिसून आल्यास जंत निर्मुलन तसेच, रक्त तपासणीनंतर त्यामध्ये काही घटकांची कमतरता दिसून आल्यास योग्य त्या औषधोपचाराचा अवलंब करण्यात यावा. गायी-म्हशी व्याल्यानंतर ९० दिवसांच्या आत माजावर येवून त्या गाभण राहिल्यास त्यांच्यातील भाकड काळ कमी राहण्यास मदत होते.

           गायी / म्हशी माजावर आल्यानंतर त्यांच्यामध्ये योग्यवेळी कृत्रिम रेतन न केल्यास जनावरांच्या दोन वेतातील अंतर वाढणे, वर्षाला एक वासरु मिळणे हे उद्दिष्ट साध्य न होणे आणि जनावरांच्या खाद्यावरील खर्चात वाढ होवून पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. सदर अभियानामध्ये खालील नमुद विविध बाबींचा समावेश असून पशुपालकांनी आपल्या वंधत्वग्रस्त जनवारांवर उपचार करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ.वाय.एस.वंजारी  यांनी कळविले आहे.

               तसेच वंध्यत्व निवारण शिबिरात काय केले जाईल ?

१.दि. ३०.११.२०२३ ते १९.१२.२०२३ या कालावधीत राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने व पशुचिकित्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये किमान एका वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन करण्यात येईल.

२.गायी-म्हशींमध्ये माजाचे चक्र नियमितपणे दिसून येणाऱ्यासाठी पशुंचा आहार व त्यांचे स्वास्थ्य यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. याचे महत्व पशुपालकांना सांगण्यात येईल.

३.प्रजननक्षम गायी-म्हशीमध्ये नियमितपणे २१ दिवसाच्या अंतराने माजाचे चक्र दिसून येणे अथवा गर्भधारणा अपेक्षित असून या दोन्हींचा अभाव असल्यास अशा पशुधनामध्ये वंध्यत्व तपासणी करून निदान करण्यात येईल.

४.जंत, गोचिड व गोमाशा प्रादुर्भावामुळे गायी-म्हशींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवून वंध्यत्व येण्याची शक्ता विचारात घेवून, ते टाळण्यासाठी पशुधनावर तसेच, गोठ्यामध्ये नियमितपणे औपधी फवारणी तसेच, गायी म्हशींमध्ये नियमित कालांतराणे जंतनाशन करुन घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

५.वंध्यत्व निवारण शिबीरामध्ये पशुपालकांना माज चक्रातील जनावरे अंदाजे किती दिवसापूर्वी माजावर होती

आणि पुढील टप्यात अंदाजे कधी माजावर येतील याची नोंद, गायी-म्हशींमधील वंध्यत्वाची विविध कारणे, त्याचे प्रकार, करावयाच्या उपाययोजना, औषधोपचार इ. बाबत मार्गदर्शन करण्यात येईल. ६. वयात आलेल्या व माज न दर्शविणाऱ्या सर्व कालवडी व पारडयांची लैंगिक तपासणी करुन कालवडी / पारडयांमध्ये जननेंद्रीयाची पूर्ण वाढ झाली आहे किंवा कसे तसेच, प्रकृती गुणांक (Body Score) तपासणी करण्यात येईल.असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुबोध नंदगवळी यांनी केले आहे.