मैदानावरील कबड्डीचा सूर प्रत्यक्ष जीवनातही लागू द्या पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे कबड्डीपटूंना आवाहन

मैदानावरील कबड्डीचा सूर प्रत्यक्ष जीवनातही लागू द्या पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे कबड्डीपटूंना आवाहन

स्व. डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी सामने

चंद्रपूर, दि.२० – मैदानावर कबड्डी खेळताना प्रत्येक संघ एक सूर, एक लक्ष आणि एक विचार घेऊन खेळतो. हाच विचार प्रत्यक्ष जीवनातही आचरणात आणावा, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कबड्डीपटूंना केले. त्याचवेळी रात्री उशिरापर्यंत प्रेक्षकांमध्ये ऊर्जा कायम ठेवणाऱ्या सर्व कबड्डीपटूंना ना. श्री. मुनगंटीवार यांनी शुभेच्छाही दिल्या.

स्व. डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य जिल्हास्तरीय कबड्डी सामने आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी नालंदा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष समीर केने, नालंदा क्रीडा मंडळाचे महामंत्री मनीष पांडे, सुधीरभाऊ फॅन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, भाजपचे जिल्हा महासचिव निलेश खरबडे, गोगी दारीजी, मुन्ना ठाकूरजी, घनश्याम बुरडकर, राजू अनचुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाषण सुरू करण्यापूर्वी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष केला. मैदानावर उपस्थित सर्व कबड्डीपटूंनी देखील त्यांच्यासोबत जयघोष केला. यावेळी खेळाडूंना शुभेच्छा देतानाच ना. श्री. मुनगंटीवार यांनी डिसेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेची माहिती दिली. ‘बल्लारपुर क्रीडा संकुल येथे २७ ते ३१ डिसेंबर २०२३ राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन आपण केले आहे. या स्पर्धेत कन्याकुमारी ते काश्मीर आणि कामरूख ते कच्छ अशा संपूर्ण भारतातील ३००० विद्यार्थी सहभागी होतील. खेळाडूंचा हा महामेळा केवळ चंद्रपूरसाठी नव्हे तर देशासाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहे,’ असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

स्पर्धेचे आयोजन करणारे सुधीरभाऊ फॅन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर व त्यांच्या टीमचेही ना. श्री. मुनगंटीवार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, ‘श्रीकांत आंबेकर व त्यांच्या टीमने एका चांगल्या स्पर्धेचे आयोजन व उत्तम नियोजन केले, त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो. श्रीकांत आंबेकर यांनी माझ्या नावाने बल्‍लारपूर येथे फॅन क्लब तयार केला व त्या माध्यमाने अनेक सामजिक उपक्रम ते राबवीत आहेत. स्वतःच्या प्रेरणेतून आपल्या मित्रांसोबत त्यांनी हा फॅन क्लब तयार केला. असे प्रेम करणारे कार्यकर्तेच माझा उत्साह वाढवत असतात. मी अश्या कार्यकर्त्यांच्या सदैव पाठिशी उभा असेन.’