वडसा येथील एस.आर.पी.एफ. मुख्यालयात पोलिस स्मृती दिनानिमित्त शहीद पोलिसांना श्रद्धांजली

वडसा येथील एस.आर.पी.एफ. मुख्यालयात पोलिस स्मृती दिनानिमित्त शहीद पोलिसांना श्रद्धांजली
◆ व्यसनमुक्ती व कुटूंब समुपदेशन कार्यक्रमाचेही आयोजन

गडचिरोली, दि.21: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 विसोरा, ता. वडसा येथील गट मुख्यालयात समादेशक विवेक मासाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहीद पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे तसेच देशाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद पोलिसांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील भारताच्या सिमेवर बर्फाच्छादित व निर्जन ठिकाणी केन्द्रीय राखीव पोलीस दलातील 10 जवान गस्त घालत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात 10 जवानांना वीरगती प्राप्त झाली. वीर जवानांनी दाखविलेल्या अतुलनिय शौर्यापासून इतरांना स्फुर्ती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी, म्हणून शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. त्याअनुषंगाने वडसा येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 शहीद पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच “सर्च” संस्था गडचिरोली अंतर्गत मुक्तिपथ अभियान कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले. गडचिरोली जिल्हयातील बाराही तालूक्यामध्ये दारु आणि तंबाखुचे प्रमाण कमी करण्याकरिता सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून  गट क्र. 13 येथे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार करिता व्यसनमुक्ती व कुटूंब समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाकरिता प्राजू गायकवाड, संघटक भारती उपाध्याय, संयोजक नयना घुगुसकर, संयोजक स्वप्निल बावणे आदी उपस्थित होते. त्यांनी पोलीस अधिकारी व अमंलदार यांना व्यसनमुक्ती व कुटुंब समुपदेशनाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच सदर कार्यक्रामाकरीता गटाचे समादेशक सहाय्यक ललित मिश्रा, सहाय्यक समादेशक  मारोती लांबेवार, पोलीस निरिक्षक (मुख्यालय) संजय गाडेकर, पोलीस निरिक्षक (कल्याण) मनोज परिहार, पोलिस उपनिरीक्षक निलेश फणसे, चंद्रशेखर धनविज व तुकाराम ढाले उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला हजर असलेल्या सर्व पोलीस अमंलदारांना समादेशक सहाय्यक ललित मिश्रा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. भविष्यातही राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 वडसा येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ललित मिश्रा यांनी सांगितले.