एड्स दिनानिमित्त ऑनलाईन स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन

एड्स दिनानिमित्त ऑनलाईन स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन

भंडारा, दि. 30 : जागतिक एड्स दिनानिमित्त 1 डिसेंबर रोजी जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फारुकी यांनी कळवले आहे.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय भंडारा व आयसीटीसी केंद्र यांच्या सहकार्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन 1 ते 15 डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये एड्स बाबत जनजागृती करून महामारी संपवूया, मातेकडून होणाऱ्या बालकाला एड्स संसर्गापासून प्रतिबंध व स्वतःचे एड्स स्टेटस जाणून घ्या या तीन विषयांवर जीआयएफ स्पर्धा, सेल्फी विथ स्लोगन स्पर्धा आणि मास्क डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना रोख रक्कम प्रमाणपत्र, पारितोषिक देण्यात येईल. ऑनलाईन स्पर्धेचे व्हिडिओ कार्यरत आयसीटी समुपदेशक यांचे व्हाट्सअप ॲप किंवा dapcubhandara@gmail.com वर 15 डिसेंबर पर्यंत पाठवण्यात यावे.

मातेकडून होणाऱ्या बाळाला एच आय व्ही किंवा एड्स संसर्गापासून प्रतिबंध करण्याबाबत महिनाभर व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच माहितीपर साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. फ्लेक्स बॅनर, स्थानिक केबल टीव्हीवर मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 तरी सर्व गर्भवती मातांनी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी एचआयव्हीची मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांनी केले आहे.