बल्लारपूर येथे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण Ø नागरिकांना मिळणार उत्तम आरोग्य सुविधा

बल्लारपूर येथे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण

Ø नागरिकांना मिळणार उत्तम आरोग्य सुविधा

चंद्रपूर दि. 12 : बल्लारपूर शहरातील टिळक वार्ड येथे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र जनतेच्या सेवेसाठी लोकार्पित झाले. या आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन परिवेक्षाधीन जिल्हाधिकारी रणजीत यादव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ, गटविकास अधिकारी अनिरुद्ध वाळके आदींची उपस्थिती होती.

बल्लारपूर शहरामध्ये एकूण 6 आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर आहेत. याअगोदर 5 आरोग्यवर्धिनी केंद्र जनतेच्या सेवेमध्ये सुरू आहे. बल्लारपूर शहरात टिळक वार्ड येथे 6 वे आरोग्यवर्धिनी केंद्र जनतेच्या सेवेत सुरू होत असल्याचा आंनद असून जनतेने या आरोग्यवर्धिनी केंद्रातून उपचार घ्यावे, असे आवाहन श्री. रणजीत यादव यांनी केले.

सदर आरोग्यवर्धिनी केंद्र दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत लोकांच्या सेवेसाठी सुरू राहील. वैद्यकीय अधिकारी येथे येणाऱ्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील तसेच संदर्भ सेवा देतील. कोणतेही रोग होऊ नये याबाबत उपचार व मार्गदर्शन या आरोग्य केंद्रातून मिळेल. जनतेने याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे म्हणाले.

सदर कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, पॅरामेडिकल स्टॉफ, आशासेविका तसेच परीसरातील नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बल्लारपूरचे तालुका आरोग्य अधिकारी व नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम तर आभार नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती डांगे यांनी मानले.