अस्वच्छ खुल्या भूखंड धारकांना मनपाने दंड ठोठावला  

अस्वच्छ खुल्या भूखंड धारकांना मनपाने दंड ठोठावला  

चंद्रपूर, ता. २६ : शहरात मोठ्या प्रमाणात खुले भूखंड आहेत. या भूखंडावर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा आणून टाकतात. या कचऱ्याची विल्हेवाट योग्य वेळी होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. अशा खुल्या भूखंडधारकांना नोटीस बजावून महानगरपालिकेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारण्यात आला.

शहरातील खुल्या भूखंडांवर होत असलेल्या अस्वच्छतेमुळे रोगराई तसेच इतर आजार व साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी, प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने खुल्या भूखंडधारकावर ३० जानेवारी २०२० रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठराव क्रमांक ३३ अन्वये   कारवाई केली जात आहे. खुल्या भूखंडावर मोठी झाडे, झुडपे, सांडपाणी जमा असलेल्या भूखंडधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना २४ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत महापौर राखी संजय कंचर्लावार, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिल्या. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी कारवाई करण्यात आली.
येत्या १५ दिवसांच्या आत खुल्या भुखंडाची सफाई करून सुरक्षा भिंत निर्माण करणे व आपल्या नावासह इतर तपशिल असलेला फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. अन्यथा खुल्या भूखंडावर सफाई शुल्काचे १० पट दंड स्वरुपात आकारणी करण्यात येई, अशी ताकीद देण्यात आली. आवश्यकता भासल्यास त्या ठिकाणी मनपाचे नावाने फलक लावण्यात येईल व भूखंड लिलायाची प्रक्रियासुध्दा करण्यात येईल, अशी तंबी मनपाने दिली आहे.

————————-
७ जणांवर प्रत्येकी ५ हजारांचा दंड
झोन एक (अ) मधील वडगाव येथील रामकृष्ण मंगरूळकर, झोन क्रमांक १ मधील तुकूम प्रभाग १ निर्माणनगर मधील लक्ष्मण गुजरकर आणि राम गुजरकर झोन २ (ब) मधील गुरुदेव चौक, लालपेठ, बाबूपेठ येथील राजू शामराव अमृतकर, झोन क्र. ३ (अ) येथे पोस्टल कॉलोनी, विठोबानगर, शास्त्रीनगर प्रभाग क्र.०२ येथील किशोर आमगांवकर, बापूजीनगर विठ्ठल मंदिर प्रभाग येथील कविता पाटील, बाबुपेठ १३ मधील गणेश एजंसी प्लॉट येथील अशोक कुपलवार यांना नोटीस बजावण्यात आली. त्यांच्याकडून  प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारण्यात आला.