रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा द्याव्यात :-जिल्हाधिकारी जिल्हा सामान्य रूग्णालय येथे भेट व पाहणी

रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा द्याव्यात :-जिल्हाधिकारी

  • जिल्हा सामान्य रूग्णालय येथे भेट व पाहणी

 

             भंडारा, दि. 06 : जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी गुरुवारी जिल्हा सामान्य रूग्णालय येथे सायंकाळच्या सुमारास भेट देऊन रूग्णालयाची पाहणी केली.रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याचे  निर्देश त्यांनी यावेळी दिले.

          यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर  मुख्याधिकारी विनोद जाधव,कार्यकारी अभियंता श्री.ठमके,आपत्ती व्यवस्थापन  अधिकारी अभिषेक नामदास यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

           जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी रूग्णालयातील प्रसूती कक्ष, औषध भांडार, रुग्ण कक्ष, अती दक्षता कक्ष यांची पाहणी करून रूग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती जाणून घेतली. तसेच  रूग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, पुरेशी औषधे आहेत का याची चौकशी करून खातरजमाही केली.

         यावेळी श्री. सोयाम यांनी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असल्याची माहिती दिली.रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना परत पाठवू नये, त्यांना आवश्यक असणारे उपचार व औषधे तातडीने उपलब्ध करून देण्याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. औषध साठा संपण्यापूर्वी पुरेशा वेळेत त्याचा अंदाज घेऊन आवश्यक औषध साठा वेळेत उपलब्ध होईल याची खात्री बाळगावी, आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचीही आस्थेने चौकशी करून रुग्णावर तातडीने आवश्यक व योग्य औषधोपचार करावेत,

         रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर रुग्णालय व रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा,  जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रलंबित बाबींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी नंतर तसेच प्रलंबित बाबीचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याचे निर्देश  त्यांनी दिले . सामान्य रुग्णालयातील रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यासोबतच सामान्य रुग्णालयातील स्वयंपाक कक्ष, नवजात बालकांसाठीचा अति दक्षता सोयी सुविधांची त्यांनी पाहणी केली.