जिल्हा कारागृहात विधी जनजागृती कार्यक्रम

जिल्हा कारागृहात विधी जनजागृती कार्यक्रम

चंद्रपूर,दि. 03 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि प्रमुख जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश सुमित जोशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कारागृहात विधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा कारागृह,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह मंचावर जिल्हा कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरेमुख्य लोक अभिरक्षक अॅड. विनोद बोरसे, सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. फलके, अॅड. मोहरकर आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शन करतांना मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी म्हणाले, गुन्हा म्हणजे माणसाच्या मनात त्यावेळी सुचलेल्या दुर्बुद्धीतून झालेले कृत्य होय. एखाद्या व्यक्तीला आपले अधिकार कायदेशीर पद्धतीने न मिळाल्यास तो व्यक्ती बेकायदेशीर बाबींचा अवलंब करत असतो. येथील उपस्थित कैद्यांनी काहीतरी बेकायदेशीर कृत्य केल्यामुळेच ते तुरुंगात आहेत. तुमच्या खटल्या संदर्भातील संपूर्ण माहिती व कागदपत्रे वकिलांकडे द्यावे. जेणेकरून, वकील खटला प्रभावीपणे लढू शकतील. कारागृहात होणाऱ्या कार्यक्रमातून चांगले ज्ञान घेऊन संकल्प करावे, चांगले वर्तन ठेवल्यास कुटुंबासोबत राहण्यासाठी लवकरच जाता येईल, पुन्हा समाजात गेल्यानंतर चांगले व्यक्ती बनून राहावे असे मार्गदर्शन त्यांनी केले.

जिल्हा कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे यांनी यावेळी उपस्थित न्यायबंद्याना शासकीय योजनांची व कारागृहाकडील उपक्रमांची माहिती दिली. ॲड. विनोद बोरसे यांनी जामीनविषयक कायदेशीर तरतुदी या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय संविधानाने अनुच्छेद कलम 21 नुसार प्रत्येकाला आपले जीवन सन्मानाने जगण्याचा हक्क बहाल केला आहे. त्यामुळे कारागृहातील न्यायबंद्याना देखील त्यांचे हक्क व अधिकार आहेत. जामीन म्हणजे आरोपीला तात्पुरते सोडणे होय. आरोपीला संबंधित यंत्रणेकडे अथवा न्यायालयाकडे कायदेशीर तरतुदीच्या आधारे जामीन अर्ज दाखल करावा लागतो. जामिनाचा अर्ज मंजूर झाल्यानंतर आरोपीला संबंधित न्यायालयात रोख रक्कम जमा करून अथवा लायक जामीनदार हजर करून योग्य त्या रकमेचा बाँड लिहून जामिनावर सुटता येते, असे त्यांनी सांगितले.

त्यासोबतच, सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. फलके यांनी प्ली-बार्गेनिंग या विषयावर तर सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड.मोहरकर यांनी न्यायबंदीवानाचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन संजीव हटवादे यांनी केले. यावेळी वरीष्ठ तुरुगांधिकारी संजय सोनवणे, प्रकाश लोमटे, ज्योती आठवले आदी उपस्थित होते.