सिंदेवाही उमेद अभियानात सावळा गोंधळ…

सिंदेवाही उमेद अभियानात सावळा गोंधळ

◾ सीआरपी निवड होऊनही तब्बल १२ महिने रुजू करून घेतले नाही.

◾ तालुका अभियान समन्वयकाचे दुर्लक्ष.

सिंदेवाही ;- पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत वासेरा येथे उमेद अभियानातील दोन्ही आयसीआरपी चे (कॅडर ) पद मागील दोन वर्षापासून रिक्त असल्यामुळे ग्राम संघाच्या माध्यमातून नवीन व्यक्तींची सीआरपी पदी निवड करण्यात आली. मात्र ग्राम संघाचे अध्यक्ष हजर नसल्याचे कारण दाखवून एका व्यक्तीची निवड योग्य ठरवून दुसरीला तब्बल १२ महिन्यापासून रुजू करून घेण्यास सिंदेवाही तालुका अभियान समन्वयक यांनी नकार दाखविला असल्याने संबंधित निवड झालेल्या व्यक्तीनी जिल्हा अभियान व्यवस्थापक यांचेकडे तक्रार दाखल केली असून संबंधितावर कारवाही करण्याची मागणी केली आहे.
तळागाळातील कुटुंबांना स्वयंरोजगार मिळावा आणि दारिद्र्य कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे. म्हणून सरकार विविध योजना राबविते. त्यापैकी एक म्हणजे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान . ग्रामीण भागातील महिला विशिष्ट उद्दीष्ट घेऊन एकत्र येतात. त्यांना सरकार या अभियानातून बळ देत आहे. यासाठी गावागावात महिला बचत गट तयार करण्यासाठी गावातीलच व्यक्तींची सिआरपी म्हणून अल्पशा मानधन तत्वावर निवड केली आहे. त्यानुसार वासेरा येथे दोन व्यक्तींची सीआरपी म्हणून निवड झाली होती. मात्र काही दिवसानंतर त्यांनी राजीनामा दिला असल्याने मागील दोन वर्षापासून येथील सीआरपी पदे रिक्त होते. मात्र तालुका अभियान समन्वयक किंवा अभियानातील इतर कर्मचारी यांनी याकडे लक्ष दिले नाही. अखेर ८ ऑगस्ट २०२२ रोजी ग्राम संघाच्या माध्यमातून एका ग्रामसभेतून अभियानाचा अनुभव असलेल्या दोन व्यक्तींची निवड करण्यात आली. आणि तसा ठराव सुद्धा कार्यवाही बुकाता लिहिण्यात आला. मात्र या ग्रामसभेला एका ग्राम संघाचे अध्यक्ष उपस्थित नसल्याचे कारण दाखवून तालुका अभियान समन्वयक तथा प्रभाग समन्वयक यांनी केवळ एकाच व्यक्तीला सीआरपी म्हणून रुजू करून घेतले. आणि एका व्यक्तीला तब्बल १२ महिने रुजू करून घेतले नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त सीआरपी यांनी याबाबत जिल्हा अभियान व्यवस्थापक यांचेकडे तक्रार दाखल केली असून सीआरपी पदी रुजू करून घेण्याची मागणी करीत संबंधितावर कारवाही करण्याची सुद्धा मागणी केली आहे.