प्रलंबित अर्जांचा निपटारा करा :- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

प्रलंबित अर्जांचा निपटारा करा :- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

16 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार सेवा महिना शासन आपल्या दारी   जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

भंडारा, दि. 26 : सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येणार आहे. या सेवा महिन्यात विविध शासकीय संकेतस्थळावर प्रलंबित अर्जाचा निपटारा करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिले.

        जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावर सेवा महिना राबविण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले  होते. या बैठकी दरम्यान जिल्हाधिका-यांनी हे निर्देश दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती.लीना फलके,जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, जिल्हा पशुसंवधन अधिकारी,डॉ.सुबोध नंदागवळी,यांच्यासह जिल्हातील संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

         आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी.बी.टी.पोर्टल, नागरी सेवा केंद्र, सार्वजनिक तक्रार पोर्टल, संबंधित विभागाच्या स्वतःच्या संकेतस्थळावर सेवा महिना कालावधीत प्राप्त अर्जांचा निपटारा करावा. यासाठी आवश्यक त्या ठिकाणी शिबिरे घेऊन प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात यावेत. असे जिल्हाधिकारी म्हणाले.

         सेवा महिन्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडित असणा-या महसूल, ग्रामविकास, नगरविकास, कृषी, आदिवासी, सार्वजनिक आरोग्य, ऊर्जा या विभागांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रलंबित नोंदीचा फेरफार, मालमत्ता हस्तांतरण नोंदणी, नव्याने नळ जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, शिकाऊ चालक परवाना, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड सुविधा, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजूरी, शासकीय कार्यालयात रोप लावणे,जन्म-मृत्यू नोंद व प्रमाणपत्र, सखी किट वाटप, नॅान क्रिमिलेअर प्रमाणपत्र, महिला बचत गटास परवानगी अशा एकूण 25 सेवांचा समावेश आहे.